जेव्हा राज ठाकरे म्हणतात, "मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय..."
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 12:38 PM2021-02-27T12:38:04+5:302021-02-27T12:47:35+5:30
MNS Raj Thackeray : आज मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे उपस्थित होते.
मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं शनिवारी मुंबईकतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी मास्क परिधान केलं नव्हंत. यावरून त्यांना पत्रकारांनी तुम्ही मास्क परिधान केला नाही असा सवाल केला. यावर उत्तर देताना मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय असं म्हणत उत्तर दिलं.
सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. अशातच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला होता. तसंच नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहनही केलं होतं. शनिवारी मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरे यांनी कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे उपस्थित होते.
यावेळी त्यांना मास्क न घालण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी मी मास्क घालत नाही, तुम्हालाही सांगतोय, असं उत्तर दिलं. "राज्यात अनेक कार्यक्रमांना गर्दी होते. सरकारच्या कार्यक्रमांनाही गर्दी होते. सरकारचे मंत्री किंवा इतर लोकं गर्दी करून धुडगुस घालू शकतात. शिवजयंतीला, मराठी भाषा दिनी मात्र नकार दिला जातो. कोरोनाचं संकट परत येतंय असं वाटत असेल तर सर्व निवडणुकाही पुढे ढकलल्या पाहिजेत. वर्षभरानं निवडणुका पुढच्या वर्षी घ्या, काहीही फरक पडत नाही," असंही ते म्हणाले.