फडणवीसांसोबतच्या 'त्या' भेटीत काय घडलं?; पहाटेची आठवण काढत शिवसेनेच्या मंत्र्यानं सर्वच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 01:58 PM2021-05-25T13:58:02+5:302021-05-25T13:59:13+5:30
निलेश राणेंच्या आरोपांना शिवसेनेच्या मंत्र्याकडून प्रत्युत्तर; सांगितला सहा दिवसांपूर्वीचा घटनाक्रम
रत्नागिरी: शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची रत्नागिरीतील विश्रामगृहात भेट घेतली. या भेटीची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. २०० लोकांसोबतची बैठक गुप्त कशी काय असू शकते?, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे, असं सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. ज्यांना जिल्ह्याचं राजकारण जमत नाही, त्यांच्याबद्दल मी काय बोलावं, अशा शब्दांत सामंत यांनी माजी खासदार निलेश राणेंना टोला लगावला.
लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना मेट्रो अन् लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्या; मनसेची मागणी
देवेंद्र फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले. रत्नागिरी गेस्टहाऊसवरउदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूमपर्यंत पोचले व देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले, असं ट्विट निलेश राणेंनी आज सकाळी केलं. त्यावर विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणं, त्यांचा आदर करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र ज्यांना ही संस्कृतीच समजत नाही, अशा लोकांना देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यासारखे नेते सोबत घेणार असतील, तर भविष्यातलं राजकारण काय असेल याची त्यांनी कल्पना करावी, असं सामंत म्हणाले.
पंतप्रधान मोदी खास माणसाला मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत; गुजरात कनेक्शन येणार कामी?
मी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात होतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तिथे आले. त्यांचं जिल्ह्यात स्वागत करण्यासाठी मी तिथे पोहोचलो. त्यावेळी तिथे शिवसेना, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. ही भेट गुप्त नव्हती. ती दिवसाढवळ्या झाली. ही घटना काही पहाटेच्या शपथविधीसारखी नव्हती. अंधारात झाली आणि मग इतरांना कळली, असं याबाबतीत झालं नाही, असा खोचक टोला सामंत यांनी लगावला. माझ्यावर असे आरोप केले म्हणून माझं करिअर थांबेल असं काहींना वाटत असेल. तर तसं काहीही होणार नाही. उद्घव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, असंदेखील ते पुढे म्हणाले.
देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते मला वरिष्ठ आहेत. त्यामुळेच मी त्यांच्या स्वागताला पोहोचलो. यात राजकारण नाही. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आरोप आणि दावे कोण करतो त्यावर अवलंबून असतं. ज्यांना जिल्ह्याचं राजकारण जमत नाही, दोन जिल्हे सांभाळता येत नाहीत, त्यांच्यावर मी कशाला बोलावं, असा सवाल विचारत सामंत यांनी राणेंना टोला लगावला. आमची भेट गुप्त नव्हती. फडणवीस माझ्या मतदारसंघात आले. म्हणून मी त्यांची औपचारिक भेट घेतली, असं सामंत यांनी सांगितलं.