दिल्लीत घडामोडींना वेग; विरोधकांच्या बैठकीपूर्वी शरद पवारांनी बोलावली NCP नेत्यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 09:54 PM2021-06-21T21:54:10+5:302021-06-21T21:57:07+5:30
NCP नेत्यांच्या बैठकीनंतर शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
नवी दिल्ली – महाराष्ट्रातील आणि देशातील राजकीय वर्तुळात सध्या शरद पवार चर्चेत आले आहेत. रविवारी शरद पवार दिल्लीत गेले. त्यानंतर आज निवडणुकीतील रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत पवारांची दुसरी भेट झाली. या भेटीनंतर मंगळवारी देशभरातील विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीत पार पडणार आहे. संध्याकाळी ४ वाजता शरद पवारांच्या दिल्ली निवासस्थानी ही बैठक होणार आहे.
मात्र विरोधकांच्या बैठकीपूर्वी तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक मंगळवारी (२२ जून) दिल्लीत होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. या बैठकीला सर्व निमंत्रित सदस्य आणि परमनंट सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार असल्याचेही माहिती त्यांनी दिली.
दरम्यान या बैठकीनंतर शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार आहे.
संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार असल्याचंही नवाब मलिक म्हणाले. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत पवारसाहेबांची भेट घेतली होती आणि आज दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून या भेटीत त्यांनी देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध होती ती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. उद्या मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत असं त्यांनी सांगितले.
भाजपा दररोज सरकार येईल याच आशेवर
भाजपा दररोज सरकार येईल या आशेवर नवनवीन विषय समोर आणून आज सरकार जाणार आहे उद्या सरकार जाणार आहे असे बोलत आहे परंतु हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेलच असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकार जाणार, लवकरच कोसळणार ही भाजपने जाहीर केलेली एकही भविष्यवाणी किंवा तारीख खरी ठरत नाहीय. महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर बनवण्यात आले आहे. सरकार जनहिताची कामे करतंय आणि सरकारच्या कामकाजावर जनता समाधानी आहे त्यामुळे हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
सोनिया गांधींनीही बोलावली महत्त्वाची बैठक
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पक्षाच्या सर्वच सरचिटणीस, राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारींच बैठक बोलावली आहे. 24 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे ही बैठक होत आहे. पंजाब आणि राजस्थानमधील काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह, आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील सध्याच्या घडामोडींमुळे या बैठकीला अधिक महत्त्व आहे. राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यातील शीतयुद्ध काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. महाराष्ट्रात काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली आहे. त्यातच, शरद पवार यांचा दिल्ली दौराही चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे, सोनिया गांधींनी बोलाविलेल्या बैठकीकडे काँग्रेससह देशातील प्रमुख पक्षांचे लक्ष लागले आहे.
यूपीए की तिसरी आघाडी?
शरद पवारांनी काँग्रेसप्रणित यूपीएचं नेतृत्त्व करावं, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अनेकदा मांडली आहे. मात्र काँग्रेस याबद्दल फारशी उत्सुक नाही. आता शरद पवारांनी दिल्लीत विरोधकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पवार तिसरी आघाडी तयार करत आहेत का, अशी चर्चा दिल्लीत सुरू झाली आहे. २०२४ च्या लोकसभेआधी भाजपविरोधात महाआघाडीची गरज असल्याचं विधान काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केलं होतं.