"आरेमधील मेट्रो कारशेड आता कांजूरमार्गला; योग्यवेळी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 02:24 AM2020-10-12T02:24:25+5:302020-10-12T02:25:03+5:30

CM Uddhav Thackeray News: समृद्धी यावी, कोरोना नको!

"Metro car shed in Aarey now on Kanjur Marg; decision to open temples in due course" | "आरेमधील मेट्रो कारशेड आता कांजूरमार्गला; योग्यवेळी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल"

"आरेमधील मेट्रो कारशेड आता कांजूरमार्गला; योग्यवेळी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल"

googlenewsNext

मुंबई : आरे येथील मेट्रो कारशेड आता कांजूरमार्ग येथील जमिनीवर उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिली. कांजूरमार्ग येथील जागेसाठी कोणताही खर्च आलेला नाही. शून्य रुपयात सरकारची ही जागा मेट्रोसाठी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

रविवारी सोशल मीडियाद्वारे नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना, आरे जंगल, मेट्रो कारशेड, अनलॉक प्रक्रिया अशा विविध मुद्यांवर भाष्य केले. आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे उभारण्यात येणार आहे. तर, आरेमध्ये मेट्रो कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत ही इतर कारणांसाठी वापरता येईल, त्यामुळे त्यासाठी खर्च झालेला निधीही वाया जाणार नाही. यामध्ये मेट्रो-३ आणि ६ नंबरच्या लाइनचे एकत्रीकरण करण्यात आल्याने जनतेचा एकही पैसा वाया जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, आरेतील झाडे वाचविण्यासाठी आंदोलन केलेल्या पर्यावरणवाद्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आरेमधील ६०० हेक्टर जागा यापूर्वीच जंगल म्हणून राखीव करण्याचा निर्णय झाला आहे. त्यात आणखी २०० हेक्टरची भर घालत मुंबई शहरातच ८०० हेक्टरचे जंगल राखले जाणार आहे. मात्र, हा निर्णय घेताना आरेतील आदिवासीपाडे, आदिवासीगोठे यांच्या अस्तित्वाला धक्का लागणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. विधानसभा निवडणुकीपूर्वी आरे येथील मेट्रो कारशेडवरून भाजप व शिवसेनेत घमासान सुरू झाले होते. सत्तांतरानंतर शिवसेनेने आरे मेट्रोशेडला स्थगिती दिली. हे कारशेड आरे पहाडी गोरेगाव येथे उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी विधिमंडळात दिली होती. यावर, राज्य सरकारची भूमिका व्यवहार्य नसल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.

मला खोटी झाडे लावता येत नाहीत
आधी पर्यावरणाचे जतन आणि राहिलेल्या ठिकाणी विकास, ही भूमिका असल्याचे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजप सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेवर निशाणा साधला. आहे ते कापायचे आणि नुसत्या थापा मारायच्या, ५०० कोटी झाडे लावली म्हणायचे. कुठे लावली एवढी झाडे, असा सवाल करतानाच मला खोटी झाडे लावता येत नाहीत, आहे ती झाडे वाचवा, जपा, ही आपली भूमिका असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मंदिर प्रश्नावरून विरोधकांना सुनावले
मंदिरे उघडण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी चांगलेच सुनावले. लोकांची जबाबदारी तुमच्यावर नाही, तर आमच्यावर आहे. आम्हाला लोकांची काळजी आहे. उगाच तंगडीत तंगडी अडकवू नका. मंदिरांबाबत आम्ही हळुवारपणे निर्णय घेत आहोत. उघडलेल्या मंदिरांतून सुबत्ता, समृद्धी यायला हवी. कोरोनाचा विषाणू नाही, असे सांगत योग्यवेळी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही
केंद्र सरकारने जो कृषी कायदा आणला आहे, त्याबाबत सर्व संबंधितांशी, शेतकरी संघटनांशी संवाद साधत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कृषी कायद्याचे फायदे आणि तोटे विचारात घेऊन राज्यातील शेतकºयांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून शेतकºयांना नुकसानभरपाई दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

मास्क हवे की लॉकडाऊन, याचा विचार करा
कोरोना अजून गेलेला नाही. काही देशांत तर याची दुसरी लाट आली आहे, त्यामुळे आपल्याला सावधपणे पुढे जावे लागत आहे. काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत आहेत. सुरू केलेली कोणतीही गोष्ट आपल्याला पुन्हा बंद होऊ द्यायची नाही. मास्क हवा की लॉकडाऊन; सुरक्षित अंतर राखणे, स्वच्छता की लॉकडाऊन, याचा विचार करा. लॉकडाऊन करण्याची वेळ पुन्हा येऊ देऊ नका, सांभाळा, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

निर्णय केवळ अहंकारातून - फडणवीस
मुंबई : आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा राज्य सरकारचा निर्णय केवळ अहंकारातून घेण्यात आल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास चार हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले.

Web Title: "Metro car shed in Aarey now on Kanjur Marg; decision to open temples in due course"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.