अखेर मंत्री धनंजय मुंडेंना माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी घेरलं; बलात्काराच्या आरोपावर म्हणाले...
By प्रविण मरगळे | Published: January 14, 2021 02:19 PM2021-01-14T14:19:09+5:302021-01-14T14:20:21+5:30
तत्पूर्वी गेल्या २ दिवसांपासून माध्यमांना टाळणाऱ्या धनंजय मुंडे यांना कॅमेऱ्याने घेरलं, शासकीय बंगल्यातून बाहेर पडत ते राष्ट्रवादी कार्यालयात जनता दरबारासाठी जात होते
मुंबई – गेल्या २ दिवसांपासून राज्यात धनंजय मुंडेंवरीलबलात्काराच्या आरोपामुळे राजकीय वातावरण पेटलं आहे. एका महिलेने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली, या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. परंतु या महिलेने ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करणारे खोटे आरोप केले असून याबाबत सविस्तर स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं आहे.
२००३ मध्ये एका महिलेसोबत माझे परस्पर संबंध होते, त्यातून आम्हाला २ मुलं आहे. या मुलांना मी माझं नाव दिलं आहे. त्याचसोबत त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारीही माझी आहे. मात्र २०१९ पासून या महिलेच्या बहिणीने मला धमकावणे आणि माझ्याकडून पैसे मागणे यासाठी दबाव टाकत आहे. सध्या हे संपूर्ण प्रकरण कोर्टात असून याबाबत जास्त बोलणं योग्य राहणार नाही. मात्र कोर्टात आपल्या सोयीनुसार सेटलमेंट करावी यासाठी हा दबावतंत्राचा भाग असू शकतो असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे.
तत्पूर्वी गेल्या २ दिवसांपासून माध्यमांना टाळणाऱ्या धनंजय मुंडे यांना अखेर कॅमेऱ्याने घेरलं, शासकीय बंगल्यातून बाहेर पडत ते राष्ट्रवादी कार्यालयात जनता दरबारासाठी जात होते, तेव्हा पत्रकारांनी धनंजय मुंडे यांना बलात्काराच्या आरोपावर प्रश्न विचारले त्यावर नो, कमेंट्स. मी जनता दरबारासाठी जात आहे असं सांगत त्यांनी माध्यमांना टाळण्याचा प्रयत्न केला. भल्या पहाटे धनंजय मुंडे हे खासगी कारमधून शासकीय बंगल्यात दाखल झाले, या गाडीच्या काचा पूर्णपणे काळ्या होत्या, यात आतमध्ये कोण बसलंय हेदेखील दिसत नव्हते, त्याचसोबत धनंजय मुंडे यांच्यासोबत असलेले सुरक्षा ताफाही नव्हता. मीडियाला चकवा देत मुंडे बंगल्यावर दाखल झाले होते.
कारवाई करण्याचे शरद पवारांचे संकेत
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप गंभीर आहेत, त्यांनी माझी भेट घेऊन सविस्तर माहिती दिली आहे. हे प्रकरण कोर्टातही सुरू आहे. धनंजय मुंडे यांनी दिलेली माहिती पक्षाच्या बैठकीत सर्व सहकाऱ्यांना सांगितली जाईल. त्यानंतर पक्ष म्हणून जो निर्णय घ्यायचा आहे तो मी घेईन, कोणावरही अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे असं सांगत धनंजय मुंडे प्रकरणात कारवाई करण्याचे संकेत शरद पवारांनी दिले आहेत.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
२०१९ पासून करूणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याबाबत आणि धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.
या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मी २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर (सोशल मीडिया) माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही असे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.