Pooja Chavan Suicide Case: "हात जोडून विनंती करतो की..."; पूजा चव्हाण प्रकरणात अखेर मंत्री संजय राठोड बोलले
By प्रविण मरगळे | Published: February 23, 2021 02:05 PM2021-02-23T14:05:13+5:302021-02-23T14:18:04+5:30
Minister Sanjay Rathod Reaction on Pooja Chavan Suicide Case: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) तपासाचे आदेश दिलेत, या चौकशीत सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील
यवतमाळ – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात(Pooja Chavan Suicide Case) आजपर्यंत मौन बाळगलेले मंत्री संजय राठोड(Minister Sanjay Rathod) यांनी या प्रकरणी पहिल्यांदाच भाष्य केले आहे, पोहरादेवी गडावर जाऊन संजय राठोड यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, यावेळी मोठ्या प्रमाणात संजय राठोड समर्थकांनी पोहरादेवी गडावर गर्दी केली होती, बंजारा समाजावरील संकट दूर व्हावं यासाठी याठिकाणी यज्ञाचं आयोजन केले होते, त्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी पत्रकार परिषदेत संजय राठोड म्हणाले की, बंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण या तरूणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला, या मृत्यूचा बंजारा समाजाला दु:खं झालंय, मात्र या प्रकरणावरून जे घाणेरडे राजकारण केले जातंय, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे, मी मागासवर्गीय समाजाचं, ओबीसी, भटक्या कुटुंबातून येऊन नेतृत्व करतो त्यामुळे माझ्या सामाजिक, राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार या माध्यमातून केला जात आहे, या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) तपासाचे आदेश दिलेत, या चौकशीत सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, पण माझी बदनामी करण्यासाठी घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका, चौकशीतून जे काही सत्य आहे ते समोर येईल असं त्यांनी सांगितले.
तसेच मागील १५ दिवसांपासून माझं काम सुरूच होतं, माझ्याबद्दल टीव्हीवरचं प्रेम पाहत होतो, या दिवसात शासकीय काम मुंबईच्या बंगल्यातून सुरू होतं, माझ्या कुटुंबातील आई-वडिल, पत्नी, मुला-बाळांना धीर देत होतो, त्यांना सांभाळण्याचं काम केलं, आज या पवित्र भूमीत येऊन पुन्हा मी माझ्या कामाला सुरूवात करणार आहे. पोलीस चौकशी सुरू आहे, या तपासातून सत्य बाहेर येईल, अरूण राठोड कोण मला माहिती नाही, सोशल मीडियात जे काही फोटो व्हायरल होत आहेत, माझ्यासोबत अनेक लोक फोटो काढतात, सर्वांना सोबत घेऊन मी काम केलं आहे, एका घटनेने मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जात आहे अशा शब्दात त्यांनी त्यांच्यावरील आरोपाचं स्पष्टीकरण दिलं आहे.
कोण आहे पूजा चव्हाण?
पुण्यामधील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने रविवारी ७ फेब्रुवारी रोजी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावरून उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री असलेले संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंग होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती.