'पंकजा मुंडें आमच्या पक्षात आल्या तर त्यांचे स्वागतच', शिवसेना नेत्याचे पंकजांना आमंत्रण
By laturhyperlocal | Published: July 18, 2021 10:15 AM2021-07-18T10:15:58+5:302021-07-18T10:18:28+5:30
Shambhuraj Desai on Pankaja Munde: पंकजा शिवसेनेत आल्यावर त्यांना योग्य सन्मान मिळेल
बीड: केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे नारज असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर पंकजा यांनी मुंबईत घेतलेल्या पदाधिकाऱ्यांची बैठकीत नाराज नसल्याचं म्हटलं होतं. यादरम्यान आता शिवसेना नेत्यानं पंकजा यांना थेट शिवसेनेत येण्याचं आमंत्रण दिलं आहे.
'पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांचं स्वागत होईल. आमच्या पक्षात त्यांना योग्य सन्मान दिला जाईल', असं वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केलं आहे. ते बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. 'पंकजा मुंडे बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्या आहेत. त्यांच्याकडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे. त्यामुळे त्या जर शिवसेनेत आल्या तर नक्कीच त्यांच स्वागत होईल. त्यांना योग्य तो मानसन्मानही आमच्या नेत्यांकडून दिला जाईल', असेही शंभुराज देसाई म्हणाले.
माझे नेते नरेंद्र मोदी-अमित शाह...
केंद्रीय मंत्रिमंडळातून प्रीतम मुंडे यांना डावलल्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्या नाराज पदाधिकाऱ्यांची समजुत काढण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत बोलताना पंकजा यांनी 'माझे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहा' असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी राज्यातील नेत्यांची नावं घेणं टाळलं होतं. तसेच, आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. ज्या दिवशी छत अंगावर पडेल तेव्हा बघू, असे सूचक विधानही त्यांनी केले होते.