धनंजय मुंडेंचा राजीनामा मागताना भाजपाने आपल्याकडे बघावे, सुनील केदार यांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 01:25 PM2021-01-15T13:25:00+5:302021-01-15T13:52:56+5:30
sunil kedar : सुनील केदार यांनी नागपुरातील पाटणसावंगी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केले.
नागपूर : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केले आहेत. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावर आता राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनीही प्रतिक्रिया दिली असून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपाने आपल्याकडे बघावे, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे आहे.
सुनील केदार यांनी नागपुरातील पाटणसावंगी गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केले. पाटणसावंगीतील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी धनंजय मुंडे यांच्यावर संबधित महिलेने केलेल्या आरोपांवर सुनील केदार यांनी आपली भूमिका मांडली.
"धनजंय मुंडे यांच्याबाबत चौकशी सुरु आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपाने आपल्याकडे बघावे. भाजपा आमदार राम कदम यांनी दांडीयाच्यावेळी केलेले वक्तव्य बघावे. धनंजय मुंडे यांच्याबाबत पोलीस चौकशी करत आहे", असे सांगत सुनील केदार यांनी भाजपावर निशाणा साधला.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केले आहेत. याबाबत धनंजय मुंडे यांनी 12 जानेवारीला फेसबुकवर संबंधित महिलेने केलेले आरोप ब्लॅकमेलिंग करणारे आणि खोटे आहेत, असे सांगत करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबतच्या संबंधांची कबुली दिली. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे.
धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणाला वेगळं वळण
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी तक्रारदार महिला ही ब्लॅकमेलर आहे, तिने आमच्यासोबतही अशाचप्रकारे हनीट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगत भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी समोर आले आहेत, धनंजय मुंडे यांनीही महिला ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्यासाठी खोटे आरोप करत आहे, तिने माझ्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केलेल्याचे अनेक मेसेज आहेत असा दावा केला होता, त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
धनंजय मुंडेंचा तूर्तास राजीनामा नाही
गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप व त्यांचा राजीनामा यावर महत्वाची चर्चा करण्यात आली. यावेळी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याचे समजते. पक्षाने माझ्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा मागितलेला नाही. तसेच, मी राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.