गुजरात काँग्रेसला मोठा झटका, अल्पेश ठाकोरसह दोन आमदारांनी सोडला पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 08:51 PM2019-04-10T20:51:57+5:302019-04-10T21:01:05+5:30
गुजरात काँग्रेसमध्ये पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा आमदारांचा सिलसिला सुरूच आहे.
अहमदाबाद- गुजरात काँग्रेसमध्ये पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा आमदारांचा सिलसिला सुरूच आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच राज्यातील राधनपूरमधील काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. अल्पेश ठाकोरबरोबर आणखी दोन आमदारांनी पक्ष सोडला आहे. अल्पेश ठाकोरबरोबर धवलसिंह ठाकोर आणि आमदार भरतजी ठाकोर यांनी काँग्रेसचा त्याग केला आहे. अल्पेश ठाकोरला लोकसभा निवडणूक लढवायची होती. परंतु त्यांना काँग्रेसनं तिकीट दिलं नाही. त्यांच्याऐवजी जगदीश ठाकोर यांना तिकीट देण्यात आलं.
अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेसकडे साबरकांठा लोकसभा जागेची मागणी केली होती, पण त्याकडेही काँग्रेसनं दुर्लक्ष केलं. अखेर त्यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी दिली आहे. अल्पेश हे काँग्रेसच्याच तिकिटावर आमदार झाले होते. मात्र, काही महिन्यांपासून ते पक्षातील नेतेमंडळींवर नाराज होते. अल्पेश हे क्षत्रिय ठाकोर सेनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. अल्पेश यांनी सेनेची बैठक बोलावली होती. तेव्हा पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, माझ्या प्रतिमेला मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या अफवा पसरविण्यात येत आहेत. शुक्रवारी याबाबत मोठी घोषणा करणार आहे. तेव्हाच पुढील निर्णय सांगेन. यावर गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना ठाकोर यांच्याशी चर्चा झाली का, असे विचारले असता त्यांनी हे ठाकोर यांनाची विचारा असे सांगितले.
MLA Alpesh Thakor of Thakor Kshatriya Sena after resigning from Congress party today: I will not join BJP. I & my two MLAs (MLA Dhavalsinh Thakor and MLA Bharatji Thakor, who have also resigned from Congress party today) will complete our 5 years' tenure as MLA. #Gujaratpic.twitter.com/hrVqZCcGqA
— ANI (@ANI) April 10, 2019
गुजरातमधील बलात्कार प्रकरण जबाबदार?
एका अल्पवयीन मुलीवर उत्तर भारतीय व्यक्तीनं बलात्कार केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये घडली. यानंतर स्थानिकांकडून उत्तर भारतीय लोकांवर हल्ले केले जात होते. त्यामुळे शेकडो उत्तर भारतीयांनी गुजरात सोडलं आहे. यावरुन अल्पेश ठाकोर वादात सापडले होते. उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांमागे अल्पेश ठाकोर आणि त्यांची ठाकोर सेना असल्याचा आरोप होत होता. याबद्दलचा ठाकोर यांचा एक व्हिडीओदेखील समोर आला होता. यानंतर आता ठाकोर यांनी सारवासारव सुरू केली होती. विशेष म्हणजे अल्पेश ठाकोर अडचणीत सापडल्यावर काँग्रेसनंदेखील हात वर केले होते. ठाकोर दोषी असतील, तर त्यांना अटक करण्यात यावी, अशी भूमिका काँग्रेसनं घेतली होती. अल्पेश यांचे मित्र समजले जाणारे पाटीदार नेते हार्दिक पटेल आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनीदेखील सावध भूमिका घेतली होती. जर हिंसाचारमागे अल्पेश ठाकोरांचा हात असेल, तर त्यांना अटक केली जावी, अशी भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतली होती.