आमदार गोपीचंद पडळकरांचा सरकारवर हल्लाबोल; धनगर आरक्षणावरून केला गंभीर आरोप

By प्रविण मरगळे | Published: December 14, 2020 12:38 PM2020-12-14T12:38:28+5:302020-12-14T12:39:00+5:30

Dhangar Reservation: विरोधात असताना महाविकास आघाडीचे नेते हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते, मात्र आता ते नेते गप्प का झाले?

MLA Gopichand Padalkar attacks government; Serious allegations made from Dhangar reservation | आमदार गोपीचंद पडळकरांचा सरकारवर हल्लाबोल; धनगर आरक्षणावरून केला गंभीर आरोप

आमदार गोपीचंद पडळकरांचा सरकारवर हल्लाबोल; धनगर आरक्षणावरून केला गंभीर आरोप

googlenewsNext

मुंबई – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी मराठा, धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगरी वेशात विधान भवनात प्रवेश केला, धनगरांच्या आरक्षणावर महाविकास आघाडी सरकार गंभीर नाही असा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगरी वेशात ढोल वाजवत आंदोलन केलं, पोलिसांनी पडळकरांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, सदाभाऊ खोत यांनीही पोलिसांना रोखत गोपीचंद पडळकर यांच्या आंदोलनात सहभाग घेतला, महाविकास आघाडी सरकारला १ वर्ष पूर्ण झालं तरी अद्याप धनगरांच्या प्रश्नावर एकही बैठक घेतली नाही, विरोधात असताना महाविकास आघाडीचे नेते हातात काठी घेऊन धनगर आरक्षणावर प्रश्न विचारत होते, मात्र आता ते नेते गप्प का झाले? असा प्रश्न पडळकरांनी उपस्थित केला.

तसेच धनगर आरक्षण प्रश्नावर झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागं करण्यासाठी धनगरी वेष परिधान करून ढोल वाजवत आंदोलन करत आहे, हा वेष आमचा स्वाभिमान, अभिमान आणि अस्तित्व आहे, या अस्तित्वाशी खेळण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करतंय. धनगरांसाठी मागील भाजपा सरकारनं ज्या योजना आणल्या त्यादेखील बंद करण्याचा घाट महाविकास आघाडी सरकार करतंय, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासींना देण्यात आलेल्या सुविधा धनगरांनाही लागू केल्या होत्या, त्यासाठी ५०० कोटींची तरतूद केली त्यातील एक रूपयाही या महाविकास आघाडी सरकारनं दिला नाही असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

दरम्यान, राज्यात शेतकऱ्यांचे हाल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दलाल मालामाल अशी स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीच्या प्रत्येक सरदाराला कारखाना, सूत गिरणी, शिक्षण संस्था, दूध संघ दिले आहेत आणि ज्यांना यातलं काही मिळालं नाही त्यांना मार्केट कमिटी द्यायचं हे धोरण दोन्ही काँग्रेस राबवतं, मोदी सरकारचा प्रयत्न हा प्रश्न मुळापासून संपवण्याचा आहे. संघटना वाढवायच्या आणि त्या पक्षाच्या दावणीला बांधायच्या, त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न तेवत ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादी करतं असंही गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

Web Title: MLA Gopichand Padalkar attacks government; Serious allegations made from Dhangar reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.