'उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राच्या मागे पनवती लागलीय', आमदार रवी राणांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 06:07 PM2021-08-01T18:07:54+5:302021-08-01T18:08:44+5:30
MLA Ravi Rana : बाळासाहेब असताना खरी शिवसेना होती. आता ही शिवसेना काँग्रेस सेना झाली आहे. उद्धव ठाकरे यांची खरी मातोश्री ही 'दहा जनपथ' आणि 'सोनिया गांधी' या आहेत,' अशी बोचरी टीका रवी राणा यांनी केली आहे.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राच्या मागे पनवती लागली आहे, असे रवी राणा यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा या शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. गेल्या काही दिवसांपूर्वी एका फेसबुक लाईव्हमध्ये बोलत असताना सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केले होते.
रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना रवी राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. 'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात सतत संकटं येत आहेत. कोरोनाचे सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात, कोरोनाचे सगळ्यात जास्त मृत्यू कुठं असतील तर महाराष्ट्रात, कोकणात चक्रीवादळ आले. पूर आला. अनेक गावं बुडाली. घरं बुडाली. लोक मरण पावले. कधी नव्हे ते मुंबईत चक्रीवादळ आले. विदर्भात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेतकरी आत्महत्या करतायेत. उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून कारभार सुरू केला, तेव्हापासून हे सुरू आहे, असे रवी राणा म्हणाले.
याचबरोबर, महाराष्ट्रात विदर्भ सुद्धा आहे. येथे नागपूर, अमरावती, यवतमाळमध्ये शेतकरी आत्महत्या करतायेत. पावसामुळे नुकसान झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट अमरावतीतून सुरू झाली. संपूर्ण देशात अमरावतीचे नाव पोहोचले. तरीही मुख्यमंत्र्यांनी दोन वर्षांमध्ये अमरावतीमध्ये पाय सुद्धा ठेवला नाही. वारंवार विनंती करूनही त्यांनी ऐकले नाही. वारंवार सांगूनही जे ऐकत नाहीत, त्याला आपल्याकडे बेशरम म्हणतात. त्यामुळे 'मातोश्री'वर बेशरमेचे झाड लावावे लागेल, अशा शब्दांत रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, काल मुंबईतील भाजपा कार्यालयाच्या उद्घाटनावेळी भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी वेळ आली तर शिवसेना भवन फोडू असे वादग्रस्त विधान केले होते. या अनुषंगाने रवी राणा यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. बाळासाहेब असताना खरी शिवसेना होती. आता ही शिवसेना काँग्रेस सेना झाली आहे. उद्धव ठाकरे यांची खरी मातोश्री ही 'दहा जनपथ' आणि 'सोनिया गांधी' या आहेत,' अशी बोचरी टीका रवी राणा यांनी केली आहे.
याआधीही मुख्यमंत्र्यांवर केली होती अक्षेपार्ह टीका
गेल्या काही दिवसांपूर्वी एका फेसबुक लाईव्ह मध्ये बोलत असताना आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केले होते. आमदार रवी राणा फेसबुक लाईव्हद्वारे बोलत असताना एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे संघर्ष करावा लागतो हे सांगत होते. त्या वेळी रवी राणा यांनी एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्याचे मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी ते म्हणाले, गोरगरीब जनता शेतकरी व युवकांचे प्रश्न विचारणार्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले.
स्वप्निल लोणकर या युवकाने फक्त एमपीएससी परीक्षा घेऊन सुद्धा मुलाखतीला न बोलावल्यामुळे आत्महत्या केली. या सरकारने लॉकडाऊनमध्ये केलेला भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न एमपीसीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न निकाली काढले नाही तर मातोश्री समोर जाऊन बेशरमचे झाड लावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेसमोर संदेश जाईल आम्ही कितीही ओरडून ज्या माणसाला कळतच नाही, असा बे... मुख्यमंत्री मी आयुष्यात पहायला नाही. बेशरमचे झाड लावल्यामुळे त्यांना काहीना काही फरक पडेल व ते राज्यातील जनतेला दिलासा देतील, असे आक्षेपार्ह विधान रवी राणा यांनी केले होते.