आमदार रवी राणांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली, म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 05:51 PM2021-07-10T17:51:18+5:302021-07-10T17:52:33+5:30
MLA Ravi Rana: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राज्यात राजकारणही जोरात सुरू आहे. दरम्यान, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात प्रश्न विचारताना भाजपा समर्थक आमदार रवी राणा यांचा तोल ढळला असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.
मुंबई - कोरोनाकाळामध्ये परीक्षा लांबवणीवर पडल्याने तसेच इतर काही कारणांमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये राज्य सरकारविरोधात संतापाची भावना आहे. दरम्यान, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राज्यात राजकारणही जोरात सुरू आहे. दरम्यान, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात प्रश्न विचारताना भाजपा समर्थक आमदार रवी राणा यांचा तोल ढळला असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. (MLA Ravi Rana criticized the Chief Minister Uddhav Thackeray in offensive language )
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एमपीएससीच्या मुद्द्यावर बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर बेशरमचं झाड लावलं पाहिजे. या बेशरमच्या झाडाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला संदेश जाईल, की कितीही ओरडलो, कितीही वेळा बोललो, कितीही वेळा मागणी केली, तरी राज्याचे मुख्यमंत्री बेशरम आहेत. त्यांना बेशरमचं झाडंच लागू पडेल. त्यामुळे मी येणाऱ्या काळात बेशरमचं झाड लावणार आहे. जेणेकरून त्यांच्यामध्ये काही ना काही परिवर्तन होईल आणि ते दिलासा देण्याचा निर्णय घेतील.
आमदार रवी राणा हे फेसबूक लाईव्ह करत होते. काही दिवसांपूर्वी एमपीएससी पास झालेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली होती. हा मुद्दा त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये केंद्रस्थानी होता. त्यावरून रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर ही टीका केली. रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील आमदार आहेत. नुकत्याच आटोपलेल्या विधानसभा अधिवेशनावेळी रवी राणा यांनी तालिका अध्यक्षांसमोरील राजदंड पळवून कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता.