साहेब तुमचा वाघ गेला! मनसे कार्यकर्ता सुनील ईरावारच्या भावाने राज ठाकरेंसमोर फोडला हंबरडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 10:31 PM2020-08-17T22:31:47+5:302020-08-17T22:32:32+5:30

आत्महत्या केलेल्या सुनील ईरावारच्या कुटुंबाशी राज ठाकरेंनी फोनवरुन संवाद साधला.

MNS activist Sunil Irawar brother call conservation with Raj Thackeray | साहेब तुमचा वाघ गेला! मनसे कार्यकर्ता सुनील ईरावारच्या भावाने राज ठाकरेंसमोर फोडला हंबरडा

साहेब तुमचा वाघ गेला! मनसे कार्यकर्ता सुनील ईरावारच्या भावाने राज ठाकरेंसमोर फोडला हंबरडा

Next

मुंबई – नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील मनसे शहराध्यक्ष सुनील ईरावार यांच्या आत्महत्येने कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जात आणि पैसा यावर येथील राजकारण चालते, त्यामुळे मी यापुढचं राजकारण करु शकत नाही असं सांगत सुनीलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येनंतर स्वत: राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना धीर सोडू नका असं आवाहन केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सुनील ईरावार याच्या घरच्यांशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी सुनीलचा भाऊ अनिल ईरावार यांच्याशी राज यांचे बोलणं झालं, काही दिवसानंतर मी स्वत: तुमची भेट घ्यायला येईन. काळजी घ्या असं सात्वन राज ठाकरेंनी सुनीलच्या कुटुंबाचं केले.

काय झाला संवाद?

राज ठाकरे – हॅलो

अनिल ईरावार – हॅलो, अनिल बोलतोय

राज ठाकरे – जय महाराष्ट्र, राज ठाकरे बोलतोय

अनिल ईरावार – जय महाराष्ट्र साहेब, साहेब  तुमचा वाघ गेला....खूप प्रेम करायचा तुमच्यावर...

राज ठाकरे – पण काय झालं त्याला अचानक?

अनिल ईरावार – हसत-खेळत होता, काहीच कल्पना नाही, घरी भांडण नाही

राज ठाकरे – मग काय झालं त्याला?

अनिल ईरावार – अचानकच, कोणतं टेन्शन होतं काही माहिती.

राज ठाकरे – कसलं टेन्शन? माझ्याशी बोलायचं तरी.

अनिल ईरावार – मला खूप वेळा बोलला, साहेबांना भेटलो माझी किस्मत मोठी आहे, खूप भाग्यवान आहे.

राज ठाकरे– घरी कोण कोण असतं?

अनिल ईरावार – आम्ही सगळे एकत्रित कुटुंबात राहतो, ४ भाऊ, वहिनी, आताच एन्गेजमेंट झाली होती.

राज ठाकरे – काळजी घ्या, काही दिवसांनी मी स्वत: घरी येईन भेटायला, काळजी घ्या...

दरम्यान, राज ठाकरेंनी या घटनेनंतर कार्यकर्त्यांना भावनिक पत्रही लिहिलं आहे. संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं असं त्यांनी म्हटलं.

राज ठाकरेंचे संपूर्ण पत्र वाचा

सुनील ईरावार याच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं होतं?

रविवारी सकाळी सुनील ईरावार यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सुनील याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, अखेरचा जय महाराष्ट्र, राज साहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टीवर राजकारण आहे. दोन्ही माझ्या जवळ नाही.”जय महाराष्ट्र..जय राज साहेब..जय मनसे अशी सुसाईड नोट लिहून त्यांनी आत्महत्या केली आहे. तसेच या पुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका. आई, पप्पा, काका, काकू, मोठी वहिनी, छोटी वहिनी, पप्पू दादा, मला माहित आहे मी माफ करण्याच्या लायकीचा नाही, तरी पण तुम्ही सर्वजण मला माफ कराल अशी अपेक्षा आहे असं या सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.

“कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच”

Web Title: MNS activist Sunil Irawar brother call conservation with Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.