दक्षिण मुंबईत कमी झाला मनसेचा प्रभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 01:49 AM2019-04-17T01:49:36+5:302019-04-17T01:49:58+5:30
आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या मनसेने यंदाची लोकसभा न लढविता काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले
- शेफाली परब-पंडित
मुंबई : आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या मनसेने यंदाची लोकसभा न लढविता काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. मात्र दक्षिण मुंबईत गेल्या लोकसभा निवडणुकीत तिसºया क्रमांकावर असलेले मनसेचे इंजीन पुढच्या निवडणुकांमध्ये धडाडले नाही. पालिका निवडणुकीत निवडून आलेले सहा नगरसेवकही शिवसेनेत गेल्यामुळे मनसे तेथेही नामशेष झाले.
त्यामुळे मनसेचा प्रभाव कमी होताना दिसून आला आहे. गिरगाव, ताडदेव, भायखळा, शिवडी या भागांमध्ये असलेली मनसेची काही मतेच तेवढी काँग्रेसच्या पारड्यात पडतील. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत मनसेने दुसरा क्रमांक मिळवत शिवसेनेचा पत्ता साफ केला. पण हाच प्रभाव मनसेला पुढच्या पाच वर्षांत राखता आला नाही.
मधल्या काळात मनसेतील मतभेद, दुफळी उजेडात आल्यामुळे मतदारांमध्ये या पक्षाकडून असलेल्या अपेक्षा कमी होत गेल्या. परिणामी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे तिसºया क्रमांकावर फेकली गेली. तरीही या पक्षाने ८४ हजार मते मिळविली होती. काँग्रेसला संधी देण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाबाबत पक्षांतर्गतच संभ्रम आहे. त्यामुळे या वेळेस तरी मनसेची मते निर्णायक ठरण्याची चिन्हे नाहीत.
>मनसेने लढविलेल्या इतर निवडणुकांचे काय झाले?
दोन लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेचा प्रभाव दक्षिण मुंबईमध्ये कमीच होताना दिसून आला. २००९ मध्ये एक लाख ६० हजार मते मिळवणाºया मनसेने २०१४ मध्ये ८४ हजार मते मिळविली. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबादेवी, वरळी, कुलाबा, मलबार हिल मतदारसंघात मनसेला सरासरी दोन ते सहा टक्केच मते पडली. भायखळ्यात १६ टक्के तर शिवडीत २० टक्के मते मिळाली होती.मुंबई महापालिकेतच मनसेचा झेंडा फडकत होता. २०१७ च्या निवडणुकीत सात नगरसेवक निवडून आले. मात्र सहा नगरसेवक शिवसेनेने फोडले. त्यामुळे आता एकच मनसे नगरसेवक आहे.