मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 09:11 PM2020-08-17T21:11:15+5:302020-08-17T21:14:33+5:30

मनसे कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून आवाहन केले आहे.

MNS president Raj Thackeray emotional letter to activists after MNS activist suicide in Nanded | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर...

Next
ठळक मुद्देमी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नकाकुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका.लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका. 

मुंबई – नांदेडमधील किनवट येथील मनसेच्या शहराध्यक्षाने गळफास घेऊन आत्महत्या केली, यावेळी त्याने राजसाहेब माफ करा, अशा आशयाने सुसाईड नोट लिहिली होती. जात आणि आर्थिक यावर राजकारण होत आहे. त्यामुळे पुढील राजकारण मी करु शकत नाही असं सांगत त्याने आत्महत्या केली. यानंतर मनसेच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून सुनील ईरावार याला श्रद्धांजली वाहण्यात आली.

मात्र सुनीलच्या आत्महत्येमुळे राजकारणात असणाऱ्या जात आणि पैसै या दोन्ही गोष्टींचा वास्तव सगळ्यांसमोर आलं आहे. या प्रकरणाची दखल खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली असून त्यांना सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

राज ठाकरेंनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की...

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,

सस्नेह जय महाराष्ट्र.

संघर्षाची भीती मला कधीच वाटली नाही, उलट तो मला माझा सोबती वाटत आला आहे. संघर्ष आला की चढ-उतार हे येणारच. पण चढ आला म्हणून हुरळून जायचं नाही वा उतार आला म्हणून विचलित व्हायचं नाही, हे मी शिकलो. पण ह्या संघर्षात माझा एखादा सहकारी कोलमडून पडतो तेंव्हा मात्र मन अस्वस्थतेने घेरून जातं.

सुनील ईरावार ह्या आपल्या नांदेडच्या सहकाऱ्याने आत्महत्या केली आणि ती करताना त्याने लिहिलंय की 'साहेब जात आणि पैसा हे दोन्हीही माझ्याकडे नाही. त्यामुळे राजकारण करणं ह्या पुढे मला शक्य नाही. म्हणून मी माझं जीवन संपवत आहे, राजसाहेब मला माफ करा.'

अरे बाबांनो, जात आणि पैशात अडकलेलं राजकारण तर आपल्याला बदलायचं आहे म्हणूनच ९ मार्च २००६ ला आपण ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ हा पक्ष सुरु केला. नवनिर्माणाच्या आपल्या ह्या लढ्यात आपल्याला पैसे आणि जात ह्यांच्या दलदलीत अडकलेलं निवडणुकीचं राजकारण बदलायचं आहे आणि म्हणूनच गेले १४ वर्ष आपण हा संघर्ष करतोय. पण हा संघर्ष सोपा नाही, प्रवाहाच्या उलट पोहणाऱ्याची सगळ्यात जास्त दमछाक होते पण त्यासाठी माझी तयारी आहे आणि तुमची देखील. म्हणूनच इतक्या चढ उतारांच्या नंतर देखील तुमची आपल्या ध्येयावरची निष्ठा ढळली नाही.

मी ह्या आधी देखील सांगत आलो आहे आणि आत्ता पुन्हा सांगतो, हा या जातीचा... त्या मतदार संघात अमुक जातीची इतकी मतं आहेत.. ह्या उमेदवाराकडे पैसा ओतायची इतकी ताकद आहे... असल्या गोष्टीत मला स्वारस्य नाही, मला माझ्या पक्षाचं राजकारण असल्या गोष्टींवर चालवायचं नाही, यश जेंव्हा यायचं असेल तेंव्हा येईल. त्यासाठी मी माझी तत्व सोडणार नाही आणि तुम्ही धीर सोडू नका. तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर लक्षात ठेवा त्याचा सगळ्यात जास्त त्रास मला होईल.

सुनील ईरावारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी श्रद्धांजली अर्पण करतो, आणि तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की माझ्या कुठल्याही सहकाऱ्याला अशी श्रद्धांजली वाहण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कुटुंब आहे. त्यामुळे कधीही मन उदास झालं तर एकमेकांशी बोला, लढाई कठीण असली तरी अंतिम विजय आपलाच आहे हे विसरू नका. 

कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती कठीण आहे, ह्या काळात स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबीयांची काळजी घ्या.

आपला नम्र,

राज ठाकरे

 

Web Title: MNS president Raj Thackeray emotional letter to activists after MNS activist suicide in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.