“महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का?”; राज ठाकरे संतापले

By प्रविण मरगळे | Published: October 1, 2020 08:26 PM2020-10-01T20:26:51+5:302020-10-01T20:28:15+5:30

Hathras Gangrape, Raj Thackeray News: अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

MNS Raj Thackeray got angry over Hathras gang rape & people who silent on this Case | “महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का?”; राज ठाकरे संतापले

“महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का?”; राज ठाकरे संतापले

googlenewsNext
ठळक मुद्देअशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाहीत्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? उत्तरप्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे?

मुंबई - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे घडलेली बलात्काराची घटना, त्यानंतर उपचाराच्या दरम्यान त्या मुलीचा झालेला मृत्यू हे मन विषण्ण करणारं आहे पण त्याहून अधिक भीषण प्रकार म्हणजे त्या मुलीचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या ताब्यात न देता तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करणं. उत्तरप्रदेश पोलीस आणि तिथलं प्रशासन नक्की काय लपवायचा प्रयत्न करत आहे? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

याबाबत राज ठाकरे म्हणाले की, हाथरस मधली ही घटना पाशवी आहे, पण अशा घटना घडल्या की काही दिवस राग व्यक्त करायचा आणि पुढे शांत बसायचं हे होऊन चालणार नाही, ह्यावेळेस अशा प्रवृत्तींच्या विरोधात, त्यावर अतर्क्य वागणाऱ्या कुठल्याही प्रशासनाला केंद्र सरकारने वठणीवर आणलेच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसेच बरं, समजा त्या पीडित मुलीच्या घरच्यांना कोणी भेटायला जात असेल तर त्यांना का अडवलं जात आहे? त्यांना धक्काबुक्की का केली जाते? नक्की कशाची भीती तिथल्या सरकारला वाटत आहे? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.

त्याचसोबतच महाराष्ट्रात एखादी घटना घडली तर स्वतःच स्वतःला देशाचा आवाज घोषित करून त्यावर अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत? सर्व माध्यमं उत्तरप्रदेश सरकारवर आज का तुटून पडत नाहीयेत? त्यांना का जाब विचारला जात नाहीये असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गेल्या महिनाभरापासून सुरु महाराष्ट्र सरकारवर आगपाखड करणाऱ्या चॅनेलचा समाचार घेतला.

घटनेबाबत महिला आयोगाने मागविले स्पष्टीकरण

उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील दलित मुलीवर सवर्णांनी केलेल्या बलात्काराच्या भीषण घटनेची कसून चौकशी करण्यात यावी व दोषींना अत्यंत कठोर शिक्षा करावी, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बुधवारी दिले आहेत. हाथरसमधील बलात्कार प्रकरणाबाबत मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवर चर्चा केली. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयासमोर चालविण्यात येईल. दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्यांनी तिची जीभ कापली होती. यावेळी झालेल्या मारहाणीत तिच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. राष्ट्रीय महिला आयोगाने उत्तर प्रदेश सरकारकडून स्पष्टीकरण मागविले आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, या संघटनेचे दिल्ली विभागाचे प्रमुख हिमांशू वाल्मीकी हे हाथरसला निघालेले असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते व आता दोघेही बेपत्ता आहेत असा आरोप चंद्रशेखर आझाद यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे.

१४ सप्टेंबरला सामूहिक बलात्कार

हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. प्रथम अलिगडच्या जेएन मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नंतर सोमवारी तिला दिल्लीला हलविण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले होते की, घटनेच्या वेळी या मुलीचा गळा दाबण्यात आला. अलिगडच्या हॉस्पिटलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, या मुलीचे पाय पूर्णपणे निष्क्रिय झाले होते आणि हातालाही लकवा झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत.

Web Title: MNS Raj Thackeray got angry over Hathras gang rape & people who silent on this Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.