‘लाव रे तो व्हिडीओ’तून मनसेची मुख्यमंत्र्यांना आठवण; “स्वत:ची मागणी पूर्ण करा अन्...”
By प्रविण मरगळे | Published: October 21, 2020 10:10 AM2020-10-21T10:10:14+5:302020-10-21T10:19:56+5:30
MNS, CM Uddhav Thackeray News: भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी केली आहे. तर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ पोस्ट करून शेतकऱ्यांना मदत करा अशी विनंती केली आहे.
मुंबई – परतीच्या पावसामुळे राज्यात अतिवृष्टीचं संकट उभं राहिलं आहे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं असून पूरामुळे पिकं वाहून गेली आहेत, घरं कोसळली आहे, हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलं आहे. या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विरोधकांकडून सातत्याने ठाकरे सरकारवर दबाव टाकण्याचं काम सुरु आहे.
भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा अशी मागणी केली आहे. तर आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ पोस्ट करून शेतकऱ्यांना मदत करा अशी विनंती केली आहे. या व्हिडीओत सत्तेत येण्यापूर्वी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर भेटीगाठी करताना दिसत होते, त्यावेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तेव्हा उद्धव ठाकरेंनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५ हजारांची मदत करा अशी मागणी केली होती, शेतकऱ्यांना दिलासा देताना त्यांनी कागदी घोडे नाचवण्याआधी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी आग्रही मागणी केली होती.
मुख्यमंत्रीजी जनभावना लक्षात घेऊन बांधावर ची स्थिती बघितल्याबद्दल तुमचे आभार. सोबत तुमचाच 1 विडिओ पोस्ट करीत आहे. तुम्ही स्वतः च मागणी केल्याप्रमाणे सरसकट 25000 हेक्टरी द्यावे व स्वतः च केलेली मागणी पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा दयावा. pic.twitter.com/Pa1LuCnqJI
— Bala Nandgaonkar (@BalaNandgaonkar) October 20, 2020
मात्र काळ बदलला, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. त्यामुळे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय की, मुख्यमंत्र्यांनी जनभावना लक्षात घेऊन बांधावरची स्थिती बघितल्याबद्दल तुमचे आभार. सोबत तुमचाच १ व्हिडीओ पोस्ट करीत आहे. तुम्ही स्वतः च मागणी केल्याप्रमाणे सरसकट २५ हजार हेक्टरी द्यावे व स्वतःच केलेली मागणी पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं त्यांनी सांगितलं आहे.
देवेंद्र फडणवीसांनीही केली होती टीका
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्यात अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी सरकारनं १० हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली होती. 'सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली १० हजार कोटी रुपयांची मदत अतिशय तुटपुंजी आहे. या मदतीमुळे काहीही होणार नाही. सरकारनं निकषाच्या फुटपट्ट्या बाजूला ठेवून हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत तातडीनं जाहीर करावी. शेतकऱ्यांचं हेक्टरमागील नुकसान २५ ते ५० हजार रुपये इतकं आहे,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. फडणवीस यांनी उद्धव यांचा तोच व्हिडीओ दाखवत मुख्यमंत्र्यांकडे आता शेतकऱ्यांना मदत करण्याची संधी आहे. त्यांनी तातडीनं शेतकऱ्यांना मदत करून दिलासा द्यावा असा टोला लगावला होता.
अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रचंड मोठ्या संकटात आहे. त्याला मदतीची गरज आहे. त्यामुळे सरकारनं या प्रश्नात राजकारण करू नये. सत्तेत असलेल्यांनी संयम दाखवायचा असतो. पण तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकीय बोलत होते. सत्तेत असलेल्या व्यक्तींनी संयमीपणे वागायचं असतं. संवेदनशीलपणे प्रश्न हाताळायचे असतात. इच्छाशक्ती असली की मार्ग काढता येतो, असं फडणवीस म्हणाले होते. 'वेअर देअर इज अ विल, देअर इज अ वे, असं इंग्रजीत म्हणतात. पण या सरकारच्या बाबतीत वेअर देअर इज नो विल, देअर इज ओन्ली सर्व्हे, असं म्हणायला हवं', असा आरोप फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला होता.