मनसेच्या महिला पदाधिकाऱ्याचा इशारा; दम असेल तर सत्तेचा गैरवापर न करता समोरासमोर या, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 02:58 PM2020-08-18T14:58:02+5:302020-08-18T15:06:02+5:30
आम्ही तयार आहोत. पण वातावरण बिघडू नये ही जबाबदारी सत्तेत असणाऱ्या शिवसैनिकांची आहे आमची नाही असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला आहे.
ठाणे – शिवसेना आणि मनसे यांच्यातील संघर्ष संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अर्वाच्च भाषेत अविनाश जाधव यांच्याविरोधात टिप्पणी केल्यानंतर आता मनसेची महिला सेनाही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. दम असेल तर सत्तेचा गैरवापर न करता, समोरासमोर या, कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही जबाबदारी तुमची आहे आमची नाही असा इशारा मनसेच्या महिला पुणे शहराध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे.
याबाबत व्हिडीओत रुपाली पाटील म्हणाल्या की, हा वाद अविनाश जाधव यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल झाला तेव्हापासून सुरु झाला. त्यानंतर ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना आमची सत्ता आल्यावर घरातून उचलून नेऊ असं वक्तव्य केले. मग शिवसेनेच्या नेत्यांना हे वाक्य टोचण्याचं कारण काय? २५० नर्सेसवर ठाणे महापालिकेकडून अत्याचार होतो तेव्हा शिवसेना गप्प बसते, त्यावर अविनाश जाधव विरोध करत असेल तर खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातं असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत जेव्हा तुमच्या प्रमुख नेत्याला इंग्रजी पत्रकार घाणेरड्या भाषेत बोलले तेव्हा स्वाभिमान कुठे गेला होता? परंतु अविनाश जाधव यांनी कुठल्या शिवसैनिकाला उचलून आणू बोललेच नाही, त्याचा विपर्यास करुन तुम्ही सगळे बोलत असाल तर आम्हीसुद्धा मनसेचे राज ठाकरेंचे कार्यकर्ते आहोत, कुबड्याची भाषा करत असाल तर कुबड्या खेळायला तयार आहोत, आमच्यातला दम समोरासमोर दाखवू, पोकळ धमक्या द्यायच्या नाहीत. शिवसेनेच्या नेत्यांनी सत्तेचा गैरवापर करु नये. कोणाच्या मांडीवर बसून सत्तेत आहात हे परीक्षण तुम्ही करावं. तुमच्यात दम असेल तर सत्तेचा गैरवापर न करता समोरासमोर या, मग कबड्डी खेळायची की कुबड्या खेळायच्या आम्ही तयार आहोत. पण वातावरण बिघडू नये ही जबाबदारी सत्तेत असणाऱ्या शिवसैनिकांची आहे आमची नाही असा इशारा रुपाली पाटील यांनी दिला आहे.
ठाण्यात मनसे-शिवसेना संघर्ष
ठाण्यातील मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस आणि सरकारी कामात अडथळा यावरुन पोलिसांनी अटक केली, ठाणे महापालिकेसमोर नर्सेसच्या मागण्यांबाबत आंदोलन सुरु असताना खंडणी पथकाने त्यांना अटक केली. त्यानंतर मनसेने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. ५ दिवसांच्या जेलनंतर कोर्टाने अविनाश जाधव यांना जामीन मंजूर केला. मात्र या संपूर्ण घडामोडीमुळे ठाण्यात मनसे-शिवसेना संघर्ष शिगेला पोहचला. ठाण्यातील शिवसेना नेत्यांनी मनसेचे अविनाश जाधव यांच्याविरोधात मोहीम उघडली यातच अविनाश जाधव यांनी ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्यांना घरातून उचलून नेऊ असं विधान केल्याने वाद आणखी चिघळला. यानंतर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी अर्वाच्च भाषेत व्हिडीओ काढून अविनाश जाधव यांच्यावर टीका केली. त्यानंतर शिवसेना-मनसे या दोन्ही पक्षाच्या महिला आता एकमेकांविरोधात आक्रमक विधाने करत असल्याचं दिसून येते.