“मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावे म्हणून आता कोर्टात याचिका करायची की आंदोलन”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 02:13 PM2021-08-09T14:13:23+5:302021-08-09T14:14:23+5:30
भाजपनंतर आता मनसेनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई: कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नसताना तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मुंबईच्या लोकल रेल्वेमध्ये सर्वसामान्यांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिलासा देत १५ ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपनंतर आता मनसेनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या १५ ऑगस्टपासून सोडवाल, यासाठी याचिका करू का आंदोलन हे ही सांगा, असा टोला लगावला आहे. (mns sandeep deshpande criticised cm uddhav thackeray over not gone at mantralaya)
कोरोनाच्या नव्या रुग्णांचा ग्राफ कमी झाल्यानंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करावी, यासाठी सातत्याने सरकारकडे मागणी केली जात होती. भाजपसह अन्य पक्ष, संघटना यांनी आंदोलनेही केली. अखेर लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी १५ ऑगस्टनंतर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
“सगळं केंद्रानं करावं, द्यावं; मी फक्त घरात बसणार आणि ठेकेदारांची बिलं काढणार”
कोर्टात याचिका करायची की आंदोलन हे ही सांगा
आंदोलनं, याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरणं आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल १५ ऑगस्टला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो, आपलं अभिनंदन. आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या १५ ऑगस्टपासून सोडवाल यासाठी याचिका करू की आंदोलन? हेही सांगा,' असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
आंदोलन,याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरण आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल 15 ऑगस्ट ला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो आपलं अभिनंदन आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या 15 ऑगस्ट पासून सोडवाल या साठी याचिका करू का आंदोलन हे ही सांगा.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 9, 2021
दरम्यान, कोरोनाची महामाही सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे क्वचितच मंत्रालयात गेले आहेत. त्यावरून विरोधकांनी वेळोवेळी त्यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत, असा विरोधकांचा प्रश्न आहे. तोच धागा पकडून देशपांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये मंत्रालयाचा उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे.