मोदी, फडणवीसांनी देशाला राष्ट्रवाद शिकवण्याची गरज नाही - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 05:34 AM2019-04-27T05:34:58+5:302019-04-27T06:56:47+5:30
पाच वर्षे दुसऱ्यांवर टीका करण्यातच घालविल्याचा आरोप
डोंबिवली : मोदी व फडणवीस हे राष्ट्रवादाच्या नावावर मतांचा जोगवा मागत आहेत; मात्र या देशातील नागरिकांना त्यांनी राष्ट्रवाद शिकवण्याची गरज नाही. वेळ आली तर प्रत्येक नागरिक देशासाठी कुर्बानी देण्याकरिता सज्ज आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी येथे केली.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ कल्याण-शीळ रोडलगत असलेल्या प्रीमिअर ग्राउंडवर जाहीर प्रचारसभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. याप्रसंगी पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या वेळी माजी पालकमंत्री गणेश नाईक, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, अरुण गुजराथी, आमदार ज्योती कलानी, संजीव नाईक, संतोष केणे, महेश तपासे उपस्थित होते.
देशातील १२ हजार शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत आत्महत्या केल्या. काँग्रेसच्या कारकिर्दीत शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ७० हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली होती. मोदी सरकारने शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही. देशातील कारखानदारी बंद झाली आहे. तरुणांच्या हाताला काम मिळत नाही. महिलांवर अत्याचार होत आहे. त्यांच्या सुरक्षिततेची हमी सरकारने दिली नाही. सत्तेवर येण्यापूर्वी मोदी सरकारने दिलेल्या कोणत्याही आश्वासनांची पूर्तता केलेली नाही, याचा पुनरुच्चार पवार यांनी केला. गेली पाच वर्षे मोदी सरकारने केवळ नेहरू, गांधी घराण्यांतील नेत्यांवर टीका करण्यात खर्च घातली. जनतेचे प्रश्न व समस्यांविषयी बेफिकिरी दाखवली. त्याच जनतेपुढे मतांचा जोगवा ते मागत आहेत. त्यांचा निकाल लावल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहन पवार यांनी केले.
नाशिकच्या लोकांना आई, वडील नाहीत का?
राज्याचे मुख्यमंत्री भाषणे चांगली करतात; मात्र दोन दिवसांपूर्वी ते नाशिकला गेले, तेव्हा त्यांनी नाशिक दत्तक घेण्याचे जाहीर केले. दोन दिवसांनी मीदेखील नाशिकला गेलो. तेव्हा नाशिककरांना प्रश्न विचारला की, मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दत्तक घेतले. तुम्हाला काही आई, वडील नाहीत का? त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
राष्ट्रवादीच्या सभेतही, लावरे तो व्हिडीओ!
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाषणाला उभे राहिले. त्यांनी ‘लावरे ती क्लिप’ असे म्हणून क्लिप सुरू करण्यास सांगितले. तेव्हा उपस्थितांमधून ‘लावरे तो व्हिडीओ’ असा आवाज आला; मात्र ती आपली भाषा नाही, असे पाटील यांनी नम्रपणे सांगितले. नितीन गडकरी, मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची महायुती होण्यापूर्वी व सत्तेवर येण्यापूर्वीची वक्तव्ये असलेले व्हिडीओ चालवून त्यांनी महायुतीची पोलखोल केली.
राजकारण सोडून देईन - नाईक
बाबाजी पाटील यांचे डिपॉझिट जप्त करण्याचा दावा महायुतीच्या उमेदवारांकडून केला जात आहे. पाटील यांचे डिपॉझिट जप्त झाले, तर मी राजकारण सोडून देईल, असे आव्हान महायुतीला माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर सभेत दिले आहे.