काय सांगता! पंतप्रधानांच्या नावावर भाजपा ‘मोदी इडली’ विकणार; १० रुपयात पोटभरून मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 11:34 AM2020-09-01T11:34:15+5:302020-09-01T11:34:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ही इडली तामिळनाडूच्या सेलम शहरात विकण्यात येत आहे.
सेलम – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता भारतातच नाही तर जगभरात पसरली आहे. एकीकडे कोरोनाच्या संकटामुळे वर्ल्ड लीडर्स रेटींगमध्ये घसरण आली असली तरी मोदींची लोकप्रियता कमी झाली नाही. हेच उद्देशून तामिळनाडूमध्ये आता नरेंद्र मोदींच्या नावाने इडली विकण्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी या इडलीला मोदी इडली असं नावही देण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने ही इडली तामिळनाडूच्या सेलम शहरात विकण्यात येत आहे. शहरातील जवळपास २५ ते ३० दुकानांमध्ये मोदी इडलीची विक्री केली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण शहरात मोदी इडली विक्रीस उपलब्ध होणार आहे असं सांगितलं जात आहे. सेलम शहरात जागोजागी पंतप्रधानांच्या नावावर ‘मोदी इडली’ची जाहिरात केली जात आहे. या पोस्टर्सची चर्चा सगळीकडे सुरु आहे. मोदी इडलीमध्ये ग्राहकांना १० रुपयात ४ इडली खाण्यास मिळतील. त्यासोबत एका वाटीत सांबार आणि चटणी देण्यात येईल. म्हणजे १० रुपयात ग्राहकांचे पोट भरेल असा दावा करण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर इडली विकण्याची आयडिया राज्यातील भाजपा नेते महेश यांच्या डोक्यात आली. त्यांनी शहरात त्याचे पोस्टर्स झळकावून जाहिरातही केली. सोशल मीडियात सध्या पंतप्रधानांसोबत इडलीचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. मोदी इडली ही खाण्यास स्वादिष्ट असेल, ताज्या आणि शुद्ध भाज्यांनी सांबार बनवण्यात येईल. दिवसाला ४० हजार इडली बनवण्यात येईल अशी माहिती भाजपाचे नेते महेश यांनी दिली आहे.
"Modi Idly" message is spreading, people are eagerly awaiting, our idly plant installation work going on.
— Mahesh 🇮🇳 (@Mahesh10816) August 25, 2020
Will be a game changer pic.twitter.com/c56ILVGJF7
या फोटोत आपण पाहू शकता की, एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आला आहे. उजव्याबाजूला भाजपा नेते महेश यांचा फोटो आहे. पोस्टरवर १० रुपयात मोदी इडली मिळणार आहे. त्यात ४ इडलीचा समावेश असेल, पुढील आठवड्यापासून ही विक्री शहरात सुरु होईल असं पोस्टर्सवर जाहिरात देण्यात आली आहे. माध्यमांशी बोलताना प्रदेश भाजपाचे सचिव भारत आर. बालासुब्रमण्यम यांनी सुरुवातीला मोदी इडली विक्रीसाठी काही दुकाने उघडण्यात येतील. याला लोकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याच्या आधारे मोदी इडली दुकानांची संख्या वाढवण्यात येईल अशी माहिती दिली आहे. राजकीय नेते मंडळींनी अशाप्रकारे योजना आणणं नवीन नाही, महाराष्ट्रातही शिवभोजन, राजस्थानात इंदिरा रसोई योजना अशाप्रकारे योजना आणल्या आहेत.