शहीद जवानांच्या नावावर मोदी मते मागत आहेत- पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 05:37 AM2019-04-25T05:37:48+5:302019-04-25T05:38:17+5:30
'आम्ही लष्करी हल्ल्यांचे राजकारण कधीही केले नाही. उलट शहीद जवानांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका मांडली'
कोपरगाव (जि. अहमदनगर) : आम्ही लष्करी हल्ल्यांचे राजकारण कधीही केले नाही. उलट शहीद जवानांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका मांडली. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीत शहीद जवानांच्या नावावर मते मागत आहेत, असा आरोप राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
शिर्डी येथील प्रचार सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, गांधी कुटुंबाने लोकशाही राज्य स्थापन केले. ९० टक्के धरणांचा पाया जवाहरलाल नेहरूंनी रचला. कारखानदारी उभारली. इंदिरा गांधींनी बांगला देशाची निर्मिती केली. राजीव गांधींनी मोबाईल क्रांती केली.
सामान्यांसाठी दळण-वळणाची साधने उपलब्ध केली. एकाच कुटुंबातील दोन कर्तृत्ववान माणसांच्या हत्या झालेल्या असताना गांधींनी काय केले, असे मोदी कसे विचारू शकतात? देशाचा पंतप्रधान गांधी-नेहरुनंतर पवारांवर बोलतो, हे माझे भाग्य आहे. ते झोपेत सुध्दा माझे नाव घेत असतील. मोदींनी व्यक्तिगत टीका करण्याऐवजी पाच वर्षात काय केले व करणार? हे सांगावे, शेतकऱ्यांच्या भरवश्यावर निर्यात करणारा देश आम्ही निर्माण केला. पण २०१७-१९ या दोन वर्षात देशात ११ हजार ९९८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या सरकारने काय केले? २०१४ च्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीची घोषणा मोदींनी केली होती. त्याचे काय झाले? आम्ही राजकारणात नवीन पिढी तयार करीत आहोत. हा देश व राज्य पुढे नेणाºया तरुणांची फळी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या ३ राज्यांचा निकाल देशातील लोकांची मन:स्थिती सांगणारा आहे. धाडी घालण्याचे काम या सरकारने करून सत्तेचा गैरवापर केल्याचे पवार म्हणाले.
अजून मी म्हातारा नाही!
नोटबंदीनंतर मला १०० दिवस द्या, सर्व काळा पैसा बाहेर येईल आणि लोकांचे हाल थांबतील अन्यथा मला चौकात बोलावून जी शिक्षा द्यायची ती भोगायला तयार आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते.
आता मोदीना कोणत्या चौकात घ्यायचे असे सांगत शरद पवार यांनी मी अजून म्हातारा झालेलो नाही, मोदी सरकारला खाली बसवल्याशिवाय मी थांबणार नाही. त्यासाठी राज्यभर सभा घेणार असल्याचे ठणकावून निफाड (नाशिक) येथे सांगितले.