"मोदी, शहा ‘निपटा दो’ मानसिकतेचे; केंद्राची भूमिका सहकार्याची असावी"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 02:05 AM2020-10-16T02:05:43+5:302020-10-16T02:06:19+5:30
खा. संजय राऊत :महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुढे करून कितीही डावपेच खेळले तरी ‘ते’ उद्ध्वस्त होतील. भाजप शासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही?
विकास झाडे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात गुजरातची ‘निपटा दो’ मानसिकता भिनली आहे. त्यामुळे ते देशाचे नेते कधीच होऊ शकत नाहीत. केंद्राची भूमिका राज्यांना सहकार्य करण्याची असावी; परंतु दुर्दैवाने मोदींकडून तसे होत नसल्याची प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
खा. राऊत म्हणाले, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग हे खऱ्या अर्थाने देशाचे नेते ठरले.
राज्यात कोणाचे सरकार आहे, या बाबी न पाहता त्यांनी देशाचा नेता म्हणून सहकार्य केले. माजी पंतप्रधानांकडून मोदींना हे शिकता आले असते; परंतु त्यांची मानसिकताच ‘निपटा दो’ची असल्याने जिथे भाजपचे राज्य नाही त्या राज्यात केंद्र सरकार कसे वागते, हे देश बघतो आहे.
महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुढे करून कितीही डावपेच खेळले तरी ‘ते’ उद्ध्वस्त होतील. भाजप शासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही? प. बंगाल, महाराष्ट्राचे राज्यपाल वेगळ्या भूमिकेत काम करीत आहेत.
भाजप शासित राज्यात मंदिरे का उघडली नाहीत? असा सवाल खा. राऊत यांनी उपस्थित केला. खा. संजय राऊत म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मी खूप काही चांगले शिकलो. विरोधकांशी उत्तम संवाद ठेवायला पाहिजे हे त्यांनीच आम्हाला सांगितले.