मोदींकडून अच्छे दिनचा शब्दप्रयोग बंद का?-सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:19 AM2019-04-15T00:19:07+5:302019-04-15T00:19:51+5:30
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला धर्मनिरपेक्ष विचार दिले.
मुरुड : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला धर्मनिरपेक्ष विचार दिले. जातीयवादी शक्तींपासून देशाचे संरक्षण केले. हे धर्मनिरपेक्ष विचार जोपासत जातीयवादी शक्तीला सामोरे जाण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आले. नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांनी देशाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा देशाचे नेतृत्व त्यांनी उत्तमपणे पार पाडले. आधुनिक तंत्रज्ञान राजीव गांधींनी देशात आणले. मनमोहन सिंगांनी दहा वर्षांत नेत्रदीपक प्रगती केली. देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. २०१४ ला मोदींनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले; पण आता ते हा शब्दप्रयोग वापरत नाहीत, असे प्रतिपादन महाआघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनील तटकरे यांनी केले. ते मुरु ड येथील नांदगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप तसेच इतर मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचाराच्या सभेत बोलत होते.
मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वी जनधन खाती उघडा, १५ लाख येतील, असे सांगून लोकांचा अपेक्षाभंग केला. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन तरु णांना दिले. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नोटाबंदीने आर्थिक व्यवसायाला फटका बसला. शेतकऱ्यांना दीडपट आधारभूत किंमत देण्याचे सांगण्यात आले. मात्र, असे काहीही झाले नाही. महाराष्ट्र व दिल्लीतील सरकारच्या अपयशामुळे आज देश पिछाडीवर गेला आहे. या सरकारने लोकशाही असलेल्या आपल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणली, असे आरोप त्यांनी केले. १९९३ मध्ये अडवाणींनी राममंदिर बांधू असे सांगितले. उद्धव ठाकरेंनी अयोध्येत जाऊन कुंभकर्णाला उठवायला आलोय असे सांगितले. आता यांच्यात काय तडजोड झाली ते कळत नाही, असेही तटकरे म्हणाले.
शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी निधी संपवणे एवढेच कर्तव्य मानले; पण त्या व्यतिरिक्त काही केले नाही, अशी टीका त्यांनी गीते यांच्यावर केली. मुरुड परिसरात कोणतीही विकासकामे त्यांनी केली नाहीत. गीतेंनी मुरुडमध्ये १५ लाखांच्या शौचालयांव्यतिरिक्त काहीही केले नाही. दहा वर्षांपूर्वी मुरुडला पर्यटनाचा दर्जा मी मिळवून दिला. आज गीते हे आपल्या नावावर सांगत आहेत. अवजड उद्योगमंत्री असून मतदारसंघात खा. गीतेंनी एकही कारखाना आणला नाही, असे सांगतानाच येथे रोजगार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. मला मुंबई-गोवा महामार्ग टोलमुक्त करायचा आहे. रेल्वेचे प्रश्न सोडवायचे आहेत, असे सांगितले. या वेळी काँग्रेसचे माजी आमदार मधू ठाकूर, जि.प. उपाध्यक्ष आस्वाद पाटील, श्रद्धा ठाकूर आदी उपस्थित होते.