"मोदींची लोकप्रियता घटलीये", प्रशांत किशोरांचं एनडीए सरकारच्या स्थिरतेबद्दल मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 09:49 AM2024-10-01T09:49:26+5:302024-10-01T09:53:24+5:30
Prashant Kishor PM Modi : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घसरली असून, आगामी काळात ९ राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे निकाल एनडीए सरकारचे भवितव्य ठरवतील, असे विधान प्रशांत किशोर यांनी केले आहे. ते नेमकं काय म्हणाले?
Prashant Kishor on PM Modi : पूर्वाश्रमीचे राजकीय रणनीतीकार आणि जन सुराज संघटनेचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेबद्दल मोठं विधान केले आहे. त्याचबरोबर एनडीएचे सरकारच्या स्थैर्याबद्दलही प्रशांत किशोर यांनी भविष्यवाणी केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घटली आहे, यात कोणताही संशय नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वीच मी म्हटलं होतं की, मोदींची लोकप्रियता घसरत आहे", असे प्रशांत किशोर म्हणाले.
मोदींची लोकप्रियता, एनडीए सरकारचे भवितव्य; प्रशांत किशोर काय म्हणाले?
प्रशांत किशोर म्हणाले की, "यामध्ये कोणताही संशय नाही की, पंतप्रधान मोदी आणि एनडीएची सरकारची लोकप्रियता घसरली आहे. एनडीए सरकारचा पुढील कार्यकाळ दोन अडीच वर्षात नऊ राज्यात होणाऱ्या निवडणुकीच्या निकालांवर जास्त अवलंबून असेल."
याच मुद्द्यावर प्रशांत किशोर म्हणाले, "जर ९ राज्यांमधील निकाल भाजपाच्या विरोधात लागले, तर सरकारच्या स्थैर्याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागतील. पण, जर भाजपाने या राज्यांत चांगली कामगिरी केली, तर त्यांचे सत्ता कायम राहील", अशी भविष्यवाणी प्रशांत किशोर यांनी केली.
कोणत्या राज्यात होणार आहेत विधानसभा निवडणूक?
हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, बिहार, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यात २०२६ पर्यंत विधानसभा निवडणूक होतील. यातील सर्वच राज्यातील भाजपाच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.
"भाजपाची ही मजबुरी आहे"
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "भाजपाची ही मजबुरी आहे की, ते नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवू शकत नाही. भाजपाला माहिती आहे की, नितीश कुमार मुख्यमंत्री राहिले, तर बिहारमध्ये ते निवडणूक जिंकू शकत नाही; पण ते बिहारमध्ये काही करू शकत नाही. कारण दिल्लीत सरकार चालवण्यासाठी त्यांना नितीश कुमारांच्या मदतीची गरज आहे."