तीन दिवसांत तोडगा न निघाल्यास...; शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून बच्चू कडूंचा मोदी सरकारला थेट इशारा

By कुणाल गवाणकर | Published: November 30, 2020 03:20 PM2020-11-30T15:20:48+5:302020-11-30T15:22:08+5:30

गेल्या ४ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू; दिल्ली-हरयाणाच्या सीमेवर तणाव वाढला

mos bacchu kadu warns modi government over farmers agitation | तीन दिवसांत तोडगा न निघाल्यास...; शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून बच्चू कडूंचा मोदी सरकारला थेट इशारा

तीन दिवसांत तोडगा न निघाल्यास...; शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून बच्चू कडूंचा मोदी सरकारला थेट इशारा

Next

नवी दिल्ली/मुंबई: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंजाब, हरयाणातून हजारो शेतकरी दिल्लीच्या वेशीवर पोहोचले आहेत. सुरक्षा दलांनी त्यांना रोखून धरलं आहे. शेतकरी आणि पोलिसांमध्ये अनेकदा चकमक घडली आहे. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराचा, पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला जात आहे. यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यमंत्री बच्चू कडूंनी मोदी सरकारला थेट इशारा दिला आहे.

केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावं व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करेन, असा इशारा कडूंनी दिला आहे. 



संजय राऊतांचाही मोदी सरकारवर निशाणा
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून मोदी सरकारवर तोफ डागली आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दहशतवाद्यांप्रमाणे वागणूक दिली जाणं हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांविरोधात बळाचा वापर केला जात आहे. अशाच प्रकारे बळाचा वापर चीनविरुद्ध केला असता, तर लडाखमध्ये घुसखोरी झाली नसती, अशी टीका राऊत यांनी केली. 

शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच
गेल्या चार दिवसांपासून हरयाणा, पंजाबमधील हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन आंदोलनासंदर्भात चर्चा केली आहे. शेतकऱ्यांनी रस्त्यांऐवजी मैदानात आंदोलन करावं. सरकार त्यांच्याशी चर्चा करेल, असं आवाहन शहांनी केलं आहे.

Web Title: mos bacchu kadu warns modi government over farmers agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.