‘दुनिया में सबसे जादा मीडिया से डर लगता है’, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 10:53 AM2021-08-06T10:53:19+5:302021-08-06T10:53:52+5:30
Bhagat Singh Koshyari: ‘मुझे दुनिया में सबसे जादा डर लगता है, ताे वाे मीडियासे!’ हे वक्तव्य आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे. त्यांच्या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांच्या तीन दिवसीय दाैऱ्याला गुरुवारपासून नांदेडमधून प्रारंभ झाला.
नांदेड : ‘मुझे दुनिया में सबसे जादा डर लगता है, ताे वाे मीडियासे!’ हे वक्तव्य आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे. त्यांच्या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांच्या तीन दिवसीय दाैऱ्याला गुरुवारपासून नांदेडमधून प्रारंभ झाला. यावेळी त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात हे वक्तव्य केले.
दिवसभर त्यांचे भरगच्च कार्यक्रम होते. विद्यापीठात राज्यपाल कोश्यारी यांनी श्री गुरुगोविंदसिंघ अध्यासन केंद्र इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. विद्यापीठ येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल म्हणाले, मला लोकांमध्ये मिसळून राहायला आवडते. लोकांमध्ये गेलो तर अनेक गोष्टी शिकायला मिळतात.
नियोजनात नसलेल्या गणित संकुलाची इमारत पाहण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. त्यामुळे यंत्रणेची धावपळ उडाली. नंतर त्यांनी रेन हार्वेस्टिंगची पाहणी केली. रेन हार्वेस्टिंगला मदतीसाठी मी राज्य सरकारला सूचित करतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यपालांनी विद्यापीठ परिसरातील जलपुनर्भरण योजनेचीही पाहणी केली. वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील वसतिगृहाचे उद्घाटन आणि पाहणी दौरा राज्यपालांनी टाळला.
मी कुठलीही आढावा बैठक घेतली नाही, जनतेच्या विकासाचे जे तीन डेव्हलपमेंट बोर्ड आहेत त्याचे अधिकार मला संविधानाने दिले आहेत, मी जिथे जातो तिथे दोन-तीन अधिकाऱ्यांना बोलावून त्याबाबत चर्चा करतो, तशीच चर्चा आज केली.
- भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
गुरुद्वाराचे पायऱ्यांवरूनच घेतले दर्शन
विद्यापीठातील कार्यक्रम आटोपल्यानंतर राज्यपाल सचखंड गुरुद्वारा येथे पोहोचले. मात्र, धार्मिकस्थळ बंद असल्यामुळे गुरुद्वाराच्या पायऱ्यांवरूनच त्यांनी दर्शन घेतले. तिथे त्यांनी गुरुद्वारा बोर्डाचे दोन सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी कोश्यारी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.