गोडसेबद्दलच्या विधानावर माफीची गरज नाही; साध्वींच्या बचावासाठी मोदींचे मंत्री धावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 10:42 AM2019-05-17T10:42:31+5:302019-05-17T10:44:36+5:30
साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विधानाचं केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडेंकडून समर्थन
नवी दिल्ली: राष्ट्रपिता महात्मा गांधीची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हटल्यानं भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह वादात सापडल्या. यानंतर भाजपानं त्यांना माफी मागण्याची सूचना केली. यानंतर सिंह यांनी माफीदेखील मागितली. मात्र हे प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. गोडसेबद्दलच्या विधानाबद्दल केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी साध्वीचं समर्थन केलं आहे. या प्रकरणी माफीपासून पुढे जायला हवं. आपण आता पुढे जाणार नाही, तर केव्हा जाणार?, असं ट्विट हेगडेंनी केलं. यावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Am glad that 7 decades later today's generation debates in a changed perceptional environment and gives good scope for the condemned to be heard upon. #NathuramGodse would have finally felt happy with this debate! https://t.co/FZbXoClBK4
— Chowkidar Anantkumar Hegde (@AnantkumarH) May 17, 2019
'नथुराम गोडसेबद्दल चर्चा व्हायला हवी. सात दशकांनंतर ती वेळ आली आहे. जवळपास 7 दशकांनंतर आजची पिढी या मुद्द्यावर चर्चा करत आहे, याचा मला आनंद वाटतो. ही चर्चा ऐकून आज नथुराम गोडसेंना चांगलं वाटत असेल,' असं अनंत कुमार हेगडेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'या प्रकरणी माफीच्या पुढे जाण्याची आवश्यकता आहे. आपण आता नाही, तर केव्हा पुढे जाणार?', असा सवाल उपस्थित करत त्यांनी दुसऱ्या ट्विटमधून साध्वींच्या विधानाचं समर्थनं केलं.
Time to assert and move away from being apologetic! If not now....When??? https://t.co/AVJKr3Rm7U
— Chowkidar Anantkumar Hegde (@AnantkumarH) May 17, 2019
अनंत कुमार हेगडे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत आहेत. मोदी सरकार सत्तेत येताच संविधान बदलणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यामुळे ते चर्चेत आले. यानंतर त्यांनी सतत वादग्रस्त विधानं केली. आता अनंत कुमार यांनी थेट साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे. 'नथुराम गोडसे देशभक्त होते आणि देशभक्त राहतील. त्यांना विरोध करणाऱ्यांना देशातली जनता उत्तर देईल,' असं विधान साध्वींनी केलं होतं. यानंतर पक्षानं त्यांनी माफी मागण्यास सांगितली. यानंतर माफी मागत, मी महात्मा गांधींचा आदर करत असल्याचं साध्वींनी म्हटलं होतं.