श्रीमान शाहा तुमच्या मुलाचं काय? ममता बॅनर्जींचा अमित शाहांना बोचरा सवाल
By बाळकृष्ण परब | Published: February 12, 2021 10:37 AM2021-02-12T10:37:55+5:302021-02-12T10:40:35+5:30
Mamata Banerjee Criticize Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी आत्या-भाचा असे नाव घेऊन केलेल्या हल्ल्याला ममता बॅनर्जींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मुख्य प्रतिस्पर्धी बनलेल्या भाजपामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यादरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी आत्या-भाचा असे नाव घेऊन केलेल्या हल्ल्याला ममता बॅनर्जींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच केंद्राने राज्याला दिलेल्या निधीचा तृणमूल काँग्रेसने केल्याचा आरोप भाजपाने सिद्ध करावा आणि आरोप सिद्ध न झाल्यास मोदी सरकारने राजीनामा द्यावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
कोलकातामध्ये बिगरशासकीय संघटना आणि इतर संघटनांच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) अमित शाहांवर हल्लाबोल केला. अमित शाहा (Amit Shah) यांच्याकडून वापरण्यात येत असलेल्या भाषेमधून अहंकाराचा वास येतो. अशी भाषा एका केंद्रीय गृहमंत्र्याला शोभत नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच तुम्ही सातत्याने आमच्यावर आत्या-भाचा नात्यावरून टीका करता. मात्र तुमच्या मुलाचं काय श्रीमान शाहा? त्याला एवढे पैसे कुठून मिळाले? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी विचारला. (Mamata Banerjee Criticize Amit Shah )
यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणासारख्या राज्यात गुंडगिरी आहे. बंगालला शांततेत राहू द्या. राज्यामध्ये भाजपाची सत्ता येऊ देता कामा नये. मी सर्वांना बंगालच्या सन्मानाचे रक्षण करण्याचे आवाहन करते. मी भाजपाला घाबरत नाही. मी रस्त्यावर उतरून लढणारी महिला आहे. मी अखेरपर्यंत संघर्ष करेन.
एक निष्पक्ष खेळ होऊ द्या. डावे आणि काँग्रेस भाजपाच्या संघात असू शकतात. मात्र आम्ही एकट्याने लढू. मी केवळ एक गोलकिपर बनेन. बघुया तुम्ही किती गोल करता ते. मी सर्व बिगरशासकीय संघटना, स्वयंसहायता समुहांना आवाहन करते की, त्यांनी बंगालचा गौरव आणि बंगालची संस्कृती वाचवा, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.