"अभिषेक बॅनर्जींनी धक्का देऊन रॉय यांना बाहेर काढलं, आता चाऊमिन खायला पुन्हा तृणमूलमध्ये गेले"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 07:29 PM2021-06-11T19:29:51+5:302021-06-11T19:34:12+5:30
Mukul Roy Joins TMC West Bengal: मुकुल रॉय यांच्या तृणमूल काँग्रेस प्रवेशावरून भाजपची टीका. भाजपची अंतर्गत माहिती तृणमूल काँग्रेसला देत असल्याचा भाजपचा आरोप.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या तृणमूल काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी असलेल्या मुकुल रॉय (Mukul roy) यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये घरवापसी केली. मुकुल रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुकुल रॉय हे आपल्या घरचेच सदस्य आहेत. ते आपल्या घरी परतले आहेत. त्यांचे अभिनंदन करते, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी पुन्हा त्यांचं स्वागत केलं. (Mukul roy joining tmc in presence of west bengal cm mamata banerjee in kolkata) परंतु यानंतर भाजपनं मात्र मुकुल रॉय यांच्यावर जोरदार टीका केली.
भाजप पश्चिम बंगालचे उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांनी मुकुल रॉय यांच्या आरोप करत ते भाजपच्या अंतर्गत सूचना तृणमूल काँग्रेसपर्यंत पोहोचवत असल्याचं म्हटलं. तसंच यामुळे भाजपचा निवडणुकांमध्ये पराभव झाला. "ते पहिल्यांदा भाजपच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक जिंकले होते. जाण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला असता तर बरं झालं असतं," असंही त्यांनी नमूद केलं. "राजकारणात सोयीस्कर भूमिका घेणारी लोकंही असतात. तेच अशी कामं करतात. जेव्हा तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी यांचं वर्चस्व वाढलं तेव्हा त्यांच्यासोबत रॉय यांची शाब्दीक चकमक झाली. अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना धक्का देऊन घराच्या बाहेर काढलं होतं," असं सिंह म्हणाले.
पुन्हा चाऊमिन खाण्यासाठी गेले
"त्या प्रकरणानंतर ते भाजपत आले. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते पुन्हा चाऊमिन खाण्यासाठी गेले. चाऊमिन खाऊन ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेले, नंतर पुन्हा भाजपत आले," असं म्हणत सिंग यांनी मुकुल रॉय यांच्यावर निशाणा साधला. "त्यांची आयाराम गयाराम सारखी कहाणी आहे. ज्या ठिकाणी सोयीस्कर वाटेल त्या ठिकाणी ते राहतील. पहिल्यांदा त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक जिंकली होती. त्यांना जायचं होतं तर त्यांनी किमान राजीनामा देऊन जायचं होतं. लोकांच्या मनात त्यांच्याविषयी किमान आदर तरी राहिला असता," असंही त्यांनी नमूद केलं.
#WATCH | Opportunists in politics do this. There was a rift b/w Abhishek Banerjee & him...He then joined BJP...He'll keep coming & going. He won an election for the first time, that too on BJP symbol. He should've resigned before going: Arjun Singh, WB BJP vice pres, on Mukul Roy pic.twitter.com/6JF4xMGYse
— ANI (@ANI) June 11, 2021
जनतेचे नेते नाही
"मुकुल रॉय हे कधीही जनतेचे नेते नव्हते. पश्चिम बंगालमध्ये एसी रूममध्ये बसून राजकारण होऊ शकत नाही. राजकारणातील त्यांची वेळ ही आता संपली आहे. त्यांच्यावर कोणीही आता विश्वास करत नाही. भाजपचीं अंतर्गत माहिती ते टीएमसीला देत होते हे सर्वांना माहित होतं. जर विरोधकाला तुमच्या सर्व योजना माहित असतील तर ते पराभवाचं कारण बनतं," असंही सिंह म्हणाले.