मुंबईत केवळ शिवसेनेचा नगरसेवक असलेल्याच प्रभागात लसीकरण केंद्रांची सुरूवात; आशिष शेलार यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 05:20 PM2021-05-11T17:20:32+5:302021-05-11T17:23:27+5:30
Coronavirus Vaccine : ज्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलाय, त्या ठिकाणी लसीकरण केंद्रांची सुरूवात झाली आहे, शेलार यांचं वक्तव्य
"मुंबई महानगरपालिकेनं लसीकरण केंद्रांचं उद्घाटन आणि त्यांचं काम सुरू करण्याच्या बाबतीत दुजाभाव केला आहे. एकतर्फी निर्णय त्यांनी घेतला आहे. २२७ वॉर्डात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. प्रत्यक्षात सोमवारपर्यंत १०१ वॉर्डांमध्ये केंद्र सुरू करण्यात आली. त्या १०१ केंद्रांपैकी ९० टक्क्यांच्या वर ज्या ठिकाणी शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलाय, त्या ठिकाणी लसीकरण केंद्रांची सुरूवात झाली आहे. त्या ठिकाणीच लसी उपलब्ध झाल्या आहेत," असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.
"माझ्या मतदारसंघात सहा प्रभाग समिती वॉर्ड आहेत. ज्या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक आहेत. त्या ठिकाणी लसी उपलब्ध झाल्या आणि लसीकरण केंद्रही सुरू झालं. पण भाजपचे तीन नगरसेवक असलेल्या आणि अपक्ष नगरसेवक असलेल्या ठिकाणी लसीकरण केंद्रही सुरू झालं नव्हतं आणि लसीही आल्या नव्हत्या. लस केवळ शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलेल्या भागातील लोकांनाच मिळेल का?," असा सवालही शेलार यांनी केला. या दुजाभावाची निर्मिती हे शिवसेनेचं कार्य आहे. यावर नागरिक त्रस्त असून त्याचं कारण केवळ शिवसेना असल्याचंही ते म्हणाले. टीव्ही ९ मराठीशी साधलेल्या विशेष संवाददम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
आजच्या सामनाच्या अग्रलेखाला खाली डोकं वर पाय असं म्हणावं लागेल. स्तुत्य उपक्रमांना आमचं समर्थन आहेच. महाराष्ट्रात कोरोनाचे आकडे सर्वात जास्त का आहे? मृत्यूची संख्या सर्वात जास्त का आहे? मग याच पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घ्यायचं नाही का?,” असं म्हणत शेलार यांनी जोरदार टीका केली. मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे रोज कायदेशीररित्या केंद्रापुढे हात जोडत आहे. लस द्या, जीएसटीचा पैसा द्या, आम्हाला एअरफोर्सची सुविधा द्या, १८ वर्षांवरील ४५ वर्षांवरील लसीकरणाची परवानगी द्या, या सर्व गोष्टी पुरवणाऱ्या केंद्रीय सरकारला मात्र दोष द्यायचा. त्यामुळे दुजाभावाचं राजकारण शिवसेना करत आहे, असंही ते म्हणाले.