Mumbai Electricity: पॉवर ग्रिड तज्ज्ञ आता कुठे गेलेत? मुंबईतील खंडित वीजपुरवठ्यावरून भाजपा नेत्याचा सवाल
By बाळकृष्ण परब | Published: October 12, 2020 01:52 PM2020-10-12T13:52:15+5:302020-10-12T14:10:04+5:30
mumbai electricity news : आज मुंबईत झालेल्या पॉवर ग्रिडमधील बिघाडावरून भाजपा नेते अमित मालवीय यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
नवी दिल्ली - पॉवर ग्रिड फेल झाल्याने मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरामधील वीजपुरवठा आज सकाळपासून खंडित झाला होता. आता काही भागातील वीज आली असली तरी वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत होऊ शकलेला नाही. दरम्यान, आज मुंबईत झालेल्या पॉवर ग्रिडमधील बिघाडावरून भाजपा नेते अमित मालवीय यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
जेव्हा नरेंद्र मोदींनी दहा मिनिटे लाईट बंद करून दिवे पेटवण्याचा सल्ला दिला होता तेव्हा भरपूर सल्ले देणारे पॉवर ग्रिड तज्ज्ञ आता कुठे आहेत, आता या मंडळींकडे पॉवर ग्रिड कसा सांभाळावा याबाबत उद्धव ठाकरेंना देण्यासाठी कुठलाच सल्ला नाही आहे का? असा सवाल अमित मालविय यांनी विचारला आहे.
Where are the power grid experts hiding today?
— Amit Malviya (@amitmalviya) October 12, 2020
They had a lot of advice to give when Prime Minister Modi asked us to light a diya.
Don’t they now have some advice for Uddhav on how to manage the power grid?
Mumbai has come to a grinding halt... pic.twitter.com/X5264oYAUI
आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे उद्योगधंदे, कार्यालये तसेच लोकलसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. अर्ध्यावरच लोकल बंद झाल्याने अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांना पायपीट करावी लागली. दरम्यान सुमारे अडीच तासांनंतर मुंबईतील काही भागांमधील वीजपुरवठा हा सुळळीत झाला. रीस्टोरेशनचे बहुतांश काम संपले असून, काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत दिल्या सूचना
वीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आणि मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. रुग्णालयांना वीजपुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीजपुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे आणि तात्काळ मदत करावी, असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.