मालमत्ता करमाफीवरून मुंबईकरांची फसवणूक; काँग्रेसने केला आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:23 AM2019-04-18T06:23:54+5:302019-04-18T06:24:14+5:30

मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देण्याची भाजप-शिवसेनेची घोषणा फसवी ठरली आहे.

Mumbai fraud cheating on property tax; The Congress alleged the allegations | मालमत्ता करमाफीवरून मुंबईकरांची फसवणूक; काँग्रेसने केला आरोप

मालमत्ता करमाफीवरून मुंबईकरांची फसवणूक; काँग्रेसने केला आरोप

Next

मुंबई : मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देण्याची भाजप-शिवसेनेची घोषणा फसवी ठरली आहे. युतीची घोषणा करताना मालमत्ता कर माफीबाबत अध्यादेशही काढण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र, फक्त ११ टक्केची माफी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी मालमत्ता कर भरू नये, असे आवाहन काँग्रेसने केले आहे.
आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा म्हणाले की, मालमत्ता करमाफीची युतीची घोषणासुद्धा ‘चुनावी जुमला’ ठरली आहे. लोकसभेसाठी युती जाहीर करताना ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करांतून माफी देण्याची घोषणा करण्यात आली होती. पालिकेने पाठविलेल्या नव्या बिलांमध्ये फक्त १० टक्केच कर सवलत दिल्याचे उघड झाले आहे. निवडणुका जवळ आल्यावर घोषणा केली, पण त्याचीही नीट अंमलबजावणी झाली नाही. ११ टक्केच करमाफी मिळाल्याने मुंबईकरांची निराशा झाली असून, शिवसेना-भाजप त्याची जबाबदारी स्वीकारणार का? असा सवाल देवरा यांनी केला. या वेळी मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते रवि राजा यांच्यासह आमदार भाई जगताप, चरणजितसिंग सप्रा यांच्यासह अनेक नेते मंडळी उपस्थित होते.
>पालिकेच्या जीआरमध्ये गोंधळच गोंधळ - देवरा
मुंबई महापालिकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याने, पाचशे फुटांच्या घरांना करमाफी करणे सहज शक्य आहे. मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी तर ७०० फुटांच्या घरांना करमाफी देण्याची मागणी विधानसभेत केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते. विधिमंडळात दिलेल्या आश्वासनाचीही अद्याप पूर्तता झालेली नाही. त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेले वटहुकूम नाटक ठरले आहे.
पालिकेने राज्याकडे पाठविलेल्या प्रस्तावापैकी पूर्वीचा प्रस्ताव मालमत्ता कर माफ करण्यासाठी होता. ८ मार्चच्या जीआरनुसार एकूण कररचनेचा १० ते ३० टक्के भाग माफ झाला आहे. मालमत्ता करात पाणीपट्टी, सांडपाणी कर असे एकूण दहा घटक असतात. नागरिकांकडून आकारल्या जाणाऱ्या करासोबत ‘माफी’ कोणत्या तारखेपासून दिली जाणार, याबद्दलही या जीआरमध्ये गोंधळ आहे, असेही देवरा यांनी सांगितले.

Web Title: Mumbai fraud cheating on property tax; The Congress alleged the allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.