“मुस्लीम व्यक्ती ४-४ विवाह करू शकतात मग धनंजय मुंडेंनी दुसरं लग्न केलं तर चुकीचं काय?”
By प्रविण मरगळे | Published: January 13, 2021 01:23 PM2021-01-13T13:23:10+5:302021-01-13T13:24:30+5:30
न्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील उमा खापरे यांनी दिला आहे.
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानं खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे आता राजकारण चांगलचं रंगू लागलं आहे. या प्रकरणात विरोधी पक्षाने मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा नाहीतर मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाका अशी मागणी केली आहे.
तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी बलात्काराच्या आरोपावर सविस्तर खुलासा केला आहे. धनंजय मुंडे यांच्यानुसार २००३ मध्ये करूण शर्मा नावाच्या महिलेशी त्यांनी परस्पर संबंध ठेवले होते, ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे असं स्पष्टीकरण दिलं आहे. तर त्यावर भाजपाच्या महिला आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
रेणु शर्मा आणि धनंजय मुंडे पहिल्यांदा कधी भेटले; आरोप करणारी 'ती' महिला कोण?, जाणून घ्या
हिंदू धर्मात दोन पत्नी चालत नाहीत आणि त्याला न्यायही नाही. सामाजिक न्याय खात्यासारख्या अतिमहत्त्वाच्या कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी आपण गंभीर आरोप असलेल्या बेजबाबदार व्यक्तीवर टाकलेली आहे. वरील घटनेमुळे निश्चितच समाजावर त्याचा विपरित परिणाम होणार आहे, असं भाजपाच्या महिला आघाडीच्या उमा खापरे यांनी सांगितले. तसेच वस्तुस्थितीचे गांभीर्य ओळखून आपण धनंजय मुंडे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा. अन्यथा भाजपा महिला मोर्चा आपल्या सरकारविरुद्ध सदर मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी आणि कायदेशीर कारवाईसाठी तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा देखील उमा खापरे यांनी दिला आहे.
मात्र द्विभार्या प्रतिबंधक कायदा धनंजय मुंडे यांना लागू होऊ शकत नाही. त्यांनी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नाही. मुस्लीम व्यक्ती ४ विवाह करू शकतात मग हिंदू व्यक्तीने दुसरं लग्न केलं तर काय चुकलं? असा सवाल महाराष्ट्र करणी सेनेचे अजय सिंह सेंगर यांनी उपस्थित करत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. राज्यघटना सगळ्यांनाच समान आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा निरर्थक ठरला आहे. सर्व धर्मांना विवाहाचे वेगवेगळे बंधन असू शकत नाही. फक्त हिंदू धर्मालाच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होणार नाही असं सेंगर यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत पहिल्या पत्नीपासून सुख मिळत नसेल तर मुस्लिमांप्रमाणे दुसरं लग्न करू शकतात, मुस्लीम लोक ४-४ विवाह करतात, मग हिंदूने दुसरं लग्न केले तर चुकीचं काय? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. टीव्ही ९ने याबाबत वृत्त दिलं आहे.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
२०१९ पासून करूणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याबाबत आणि धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.
या बाबत १२ नोव्हेंबर २०२० रोजी मी २०१९ पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर (सोशल मीडिया) माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे. या याचिकेत उच्च न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या विरोधात असे साहित्य प्रकाशित करण्यास प्रतिबंध करणारे आदेश पारित केले आहेत. सदरची याचिका पुढील आणखी सुनावण्यासाठी उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे आणि त्याच दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांमार्फत समेट/ समझोता घडवून आणण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. या संदर्भात करुणा शर्मा यांच्याविरोधात आम्ही स्वतः उच्च न्यायालयात गेलेलो आहोत आणि या सर्व बाबी उच्च न्यायालयाच्या विचाराधीन असल्यामुळे मी अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही असे मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.