माझा नेता मोदी... माझा नेता अमित शाह...; जोवर शक्य तोवर धर्मयुद्ध टाळणार; पंकजा गरजल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 04:00 PM2021-07-13T16:00:23+5:302021-07-13T16:03:28+5:30
Pankaja munde: पंतप्रधानांनी मला झापल्याचे वृत्त काही माध्यमांनी चालवले. मात्र माझ्या चेहऱ्यावर तसे काही दिसते का? असा सवाल करत, मला पंतप्रधान मोदींनी कधीही अपमानित केले नाही. मला माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी कधी अपमानित केले नाही. असेही पंकजा म्हणाल्या.
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात खासदार प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने अनेक पंकजा मुंडे समर्थक नाराज होते. याच पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याचेही वृत्त होते. यानंतर आज पंकजा मुंडे यांनी आपल्या नाराज समर्थकांशी संवाद साधत त्यांना विश्वास दिला. यावेळी, आपण धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तोवर करणार जोवर शक्य आहे, असे म्हणत माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह व जे पी नड्डा आहेत आणि त्यांच्यावर मला पूर्ण विश्वास आहे, असे पंकजा यांनी म्हटले आहे. (My leader is Modi Amit Shah and JP Nadda Crusades will be avoided as long as possible says Pankaja munde)
धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करतेय -
"यावेळी समर्थकांना समजावताना पंकजा म्हणाल्या, पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तोवर करते जोवर शक्य आहे. मी कुणालाही भीत नाही, निर्भय राजकारणाचे माझ्यावर संस्कार आहेत. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्यांचा कधीही अनादर केला नाही. मी निर्भय आहे ते तुमच्याच जीवावर. एक व्यक्ती स्वतःचा विचार करून काहीही मिळवू शकतो. मला माझ्यासाठी काही नको, तुमच्यासाठी हवे आहे. हे धर्मयुद्ध टळण्यासाठी माझे ऐका, आपण कष्टाने बनवलेले घर का सोडायचे. ज्या दिवशी छत अंगावर पडेल त्यादिवशी बघू”, असेही यावेळी पंकजा म्हणाल्या.
“कोण कौरव, कोण पांडव हे त्यांनीच ठरवावं”; पंकजा मुंडेंना काँग्रेसचा टोला
माझे नेते मोदी... माझे नेते अमित शाह... -
पंकजा म्हणाल्या, माझा नेता मोदी… माझा नेता अमित शाह… आणि माझा नेता जे.पी. नड्डा हे आहेत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगले विचार आहेत, असा मला विश्वास आहे. आपण कष्टाला घाबरत नाही. कोयता घेऊन कामाला जाऊ. आपल्याला काय, मला माझ्यासाठी काही नको. मला प्रीतमसाठी काही नकोय. मला भाजपने अर्ज भरायला लावला होता. पण, ते मला म्हणाले तुम्हाला देणे शक्य नाही. मी म्हणाले धन्यवाद. नंतर रमेश कराडांचे नाव आले, काय बिघडले? मी कोण आहे…? तुम्ही तर प्रोटोकॉलने माझ्यापेक्षा मोठे आहात. मी तुमच्यापेक्षा छोटी आहे, मला सजवण्याचा प्रयत्न करू नका”, असेही पंकजा यावेळी म्हणाल्या.
Pankaja munde: जेव्हा मला वाटेल, आता राम उरला नाही, तेव्हा...; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा
मला माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी कधी अपमानित केले नाही -
माझा निवडणुकीत पराभव झाला. आज माझ्याकडे पदाचा अलंकार नाही. स्वाभिमानी राजकारण केले. पंतप्रधानांनी मला झापल्याचे वृत्त काही माध्यमांनी चालवले. मात्र माझ्या चेहऱ्यावर तसे काही दिसते का? असा सवाल करत, मला पंतप्रधान मोदींनी कधीही अपमानित केले नाही. मला माझ्या राष्ट्रीय नेत्यांनी कधी अपमानित केले नाही. असेही पंकजा म्हणाल्या. यावेळी पंकजा यांनी नाराज समर्थकांना कौरव आणि पांडवांचे महाभारतातील उदाहरणही दिले आणि पांडव का जिंकले आणि कौरव का पराभूत झाले, हेही समजावून सांगितले. तसेच, आपले घर आपण सोडायचे नाही, असेही पंकजा यांनी यावेळी समर्थकांना सांगितले.