Vidhan Parishad Election Result: नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाची यशस्वी खेळी; महाविकास आघाडीची ४९ मतं फुटली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 09:57 AM2021-12-14T09:57:40+5:302021-12-14T10:12:52+5:30
विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाकडे केवळ ३२५ हक्काची मते होती. त्यातील एकही मत फुटू नये म्हणून भाजपानं मतदारांना पर्यटनासाठी पाठवलं होतं.
नागपूर – विधान परिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांचा विजय झाला असून या निवडणुकीत महाविकास आघाडीची तब्बल ४९ मतं फुटली आहेत. भाजपानं या निवडणुकीत यशस्वी खेळी खेळली असून त्याचा फटका महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना बसला आहे.
भाजपाचे चंद्रशेखन बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांना ३६२ मते मिळाली तर काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते पडली. तर काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांना १ मत तर ५ मते अवैध ठरली. चंद्रशेखर बावनकुळे यांचा १७६ मतांनी दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत एकूण ५५९ मते होती. त्यातील ५ जणांनी मतदान केले नाही. ५५४ जणांपैकी ३६२ मतं भाजपा उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पारड्यात पडली.
विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाकडे केवळ ३२५ हक्काची मते होती. त्यातील एकही मत फुटू नये म्हणून भाजपानं मतदारांना पर्यटनासाठी पाठवलं होतं. विजयी उमेदवारासाठी २७५ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२, छोटू भोयर १ आणि मंगशे देशमुख यांना १८६ मते मिळाली.
काँग्रेसचा दावा ठरला फोल
मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजपा व कॉंग्रेस दोन्ही पक्षांकडून विजयाचा दावा करण्यात आला. मतदारांची संख्या जास्त असल्याने सुरुवातीपासूनच भाजपाकडून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. बावनकुळे यांना चारशेहून अधिक मतं मिळतील, असा दावा करण्यात येत होता. तर कॉंग्रेसच्या नेत्यांनी २८० च्या जवळपास मत मिळतील, अशी भूमिका मांडली. ग्रामीण भागात भाजपाच्या ४२ मतांना फोडण्यात यश आल्याचे मंत्री सुनील केदार यांचे समर्थक सांगत होते. मात्र काँग्रेसने केलेला सर्व दावा आता फोल ठरल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे. या निवडणुकीत ९८.९३ टक्के मतदान झाले होते.
काँग्रेसमध्ये पोलिटिकल ड्रामा
काँग्रेसने भाजपामधून आयात केलेले नगरसेवक रविंद्र उर्फ छोटू भोयर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, मतदानाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसने उमेदवारच बदलला. गुरुवारी सायंकाळी प्रदेश काँग्रेसकडून पत्र जारी करीत भोयर यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन जाहीर करण्यात आले होते. विशेष म्हणजे रविंद्र भोयर यांनी लढण्यासाठी असमर्थता व्यक्त केल्याचे कारण प्रदेश काँग्रेसकडून जारी केलेल्या पत्रात देण्यात आले. छोटू भोयर यांनी मात्र आपण असमर्थता व्यक्त केली नसल्याचे स्पष्ट करीत पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे स्पष्ट केले होते.