सवंगडी सांभाळताना आले नाकीनऊ, कार्टून वारचा दी एण्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 04:27 AM2019-04-14T04:27:57+5:302019-04-14T04:32:02+5:30
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी ‘हायव्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळत आहे़
- चेतन धनुरे
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात यावेळी ‘हायव्होल्टेज ड्रामा’ पाहायला मिळत आहे़ पारंपरिक वैैर जपलेल्या पाटील-राजेनिंबाळकर घराण्यातील पुढच्या पिढीत पुन्हा लढत रंगली असून, वैयक्तिक टीकेचे विखारी डोस पाजून झाल्यानंतर आता अखेरच्या टप्प्यात ते विकासाच्या अमृतप्याल्यात परावर्तीत झालेले दिसून येत आहेत़
राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री आ़ राणाजगजितसिंह तर शिवसेनेकडून माजी आ़ ओम राजेनिंबाळकर हे चुलतभाऊ आमनेसामने आले आहेत़ प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात दोन्हीकडून ‘कार्टून वार’ रंगले़ दोघांचाही भूतकाळ अन् वर्तमानकाळ कुंचल्याच्या टोकदार टोकाने चितारत शितोंडेही उडविले गेले़ हे कार्टून वार थांबते न थांबते तेच दोन्हीकडून क्लीप वार रंगला़ आता या दोन्ही बाबींना अखेरच्या टप्प्यात विराम मिळाल्याचे दिसून येत आहे़ नीति आयोगाच्या यादीत मागास म्हणून नोंद असलेल्या उस्मानाबादच्या या स्थितीस जबाबदार कोण? यावरून सभांमधून मनोरंजक विधाने केली जात आहेत़ या सगळ्यात ‘विकास की बात’ मात्र भरकटलेली होती़ मतदारांमधून याविषयी नाराजी व्यक्त होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, आता आम्हीच कसा विकास घडवून आणू शकतो, यावर भर दिला जात आहे़
उद्योग, रोजगार, २१ टीएमसी हक्काचे पाणी हे प्रमुख मुद्दे आता प्रचारात आले आहेत़ एकीकडे या घडामोडी सुरु असतानाच महाआघाडी व महायुतीतील सवंगडी सध्यातरी एकदिलाने काम करताना दिसताहेत़ मात्र, पूर्वानुभव लक्षात घेता अखेरच्या टप्प्यात ‘हात’ देण्याची परंपरा यावेळी पुन्हा सुरू राहणार नाही, याची काळजी राष्ट्रवादी घेत आहे़ दुसरीकडे बऱ्याचदा भाजप राष्ट्रवादीच्या मदतीला धावायची़ मात्र, यंदा एकेक खासदार महत्त्वाचा असल्याने, ती शिवसेनेबरोबर निष्ठेने काम करताना दिसत आहे़ तरीही त्यांना सांभाळून ठेवण्याचे कष्ट शिवसेनेला घ्यावेच लागत आहेत़ वंचित आघाडीच्या सभेला उत्स्फूर्त जमलेली गर्दी, स्वयंप्रेरणेने दिली जात असलेली मदत पाहता अर्जुन सलगर सावकाशपणे पुढे जाताना दिसत आहेत़ ही आघाडी पाटील किंवा राजेनिंबाळकरांना पराभूत करण्यात मोठा वाटा उचलणार हे एवढे मात्र निश्चित़
>आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले व विद्यमान आमदार राणाजगजितसिंह यांनी थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे़ आतापर्यंत शरद पवार, धनंजय मुंडे यांच्याच जाहीर सभा मतदारसंघात झाल्या आहेत़ नवाब मलिक, हर्षवर्धन पाटील यांचाही धावता दौरा झाला़ अन्य बडे नेते मतदारसंघात फिरकले नसले, तरी स्थानिक समीकरणे जुळवून आघाडी घेण्याची तयारी सुरू आहे़
>माजी आमदार ओम राजेनिंबाळकर हे सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच मित्रपक्षालाही सोबत ठेवून गावोगाव सभा घेत आहेत़ मतदारसंघातील औसा येथे झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यानंतर कळंबमध्ये झालेली पंकजा मुंडे यांची सभा वगळता महायुतीकडूनही बडे नेते अद्याप उतरले नाहीत़ आता रविवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उस्मानाबादेत सभा घेत आहेत़ छुप्या रसदीद्वारे पुढे जाण्याची तयारी वेगात आहे़
>कळीचे मुद्दे
कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या माध्यमातून मिळणारे २१ टीएमसी पाणी अनेक वर्षांपासून कामातच अडकून पडले आहे़
सततच्या अवर्षण स्थितीमुळे पडणारा दुष्काळ अन् तत्परतेने न मिळणारी मदत़ पीकविमा, चारा छावण्यांवरून असलेली नाराजी़