मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येत राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे नाव, राज ठाकरे म्हणाले, अशी माणसं पक्षात सांभाळायची असतील तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 12:56 PM2021-04-06T12:56:29+5:302021-04-06T12:57:32+5:30
Raj Thackeray demands action Najib Mulla :
मुंबई - ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची (Jamil Shaikh Murder Case)भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तपास करून एका आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. या आरोपीने राष्ट्रवादीचे नगरसेवक नजिब मुल्ला (Najib Mulla) यांच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर राज ठाकरे (Raj Tjackeray ) यांनी आता या प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेत नजिब मुल्ला यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तसेच सत्ताधाऱ्यांची माणसं दिवसाढवळ्या खून करताहेत. खुनाला खुनाने उत्तर द्यायला सुरुवात झाली तर सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे चित्र चांगले दिसणार नाही, असा इशारा दिला आहे. ( The name of the NCP corporator in the murder of MNS office bearer, Raj Thackeray demands action)
याबाबत राज ठाकरे म्हणाले की, मनसे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या झाली होती. या प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांनी एका आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक करण्यात आली होती. या आरोपीने दिलेल्या कबुलीजबाबात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजिब मुल्ला यांचे नाव आले आहे. सत्ताधाऱ्यांची माणसं दिवसाढवळ्या खून करताहेत. याच नजिब मुल्ला यांचं नाव सूरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणात आलं होतं. पुढे ते प्रकरण निस्तरलं गेलं. पुन्हा या नजिब मुल्लाचं नाव आलं आहे. राज्य सरकार काय कारवाई करतं ते पाहावं लागेल, असे राज ठाकरे म्हणाले.
तसेच या प्रकरणी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेणार असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. मनसेच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येच्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजिब मुल्ला यांचे नाव आले आहे. यासंदर्भात मी शरद पवार यांची भेट घेणार आहे. अशी जर मंडळी यांना पक्षात सांभाळायची असतील तर दुसऱ्यांचे हात काही बांधलेले नसतात. खुनाला खुनाने उत्तर द्यायला सुरुवात झाली तर सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे चित्र चांगले दिसणार नाही. नजिब मुल्ला याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, असे राज ठाकरे म्हणाले.