Narayan Rane: नारायण राणेंवरील कारवाईवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची होती बारीक नजर, वर्षावरून असे घेत होते अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 09:11 AM2021-08-25T09:11:48+5:302021-08-25T09:12:38+5:30
Narayan Rane Arrest News: काल दिवसभर चाललेल्या या संपूर्ण घटनाक्रमावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारीक नजर ठेवून होते. या संदर्भात ते क्षणाक्षणाची अपडेट वर्षा बंगल्यावर बसून घेत होते.
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या प्रक्षोभक विधानाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेचे नाट्य काल दिवसभर रंगले होते. अखेर रात्री उशिरा या प्रकरणात राणेंना जामीन मिळाला होता. (Narayan Rane Arrest Update) दरम्यान, काल दिवसभर चाललेल्या या संपूर्ण घटनाक्रमावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बारीक नजर ठेवून होते. या संदर्भात ते क्षणाक्षणाची अपडेट वर्षा बंगल्यावर बसून घेत होते. नारायण राणेंना अटक केल्यास होणारे परिणाम आणि भविष्यातील कारवाईबाबत निकटवर्तीयांसोबत चर्चा करत होते. (Chief Minister Uddhav Thackeray had a keen eye on the action taken against Narayan Rane)
नारायण राणेंना रत्नागिरीमध्ये अटक झाल्यानंतर त्यांना रात्री रायगडमधी महाड येथे आणण्यात आले. तेथे कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राजकीय आणि कायदेशीर उलथापालथींनी भरलेला दिवस समाप्त झाला. सर्वावर मुख्यमंत्र्यांची बारीक नजर होती. दरम्यान नारायण राणेंवरील अटकेची कारवाई ही बदल्याच्या भावनेने नाही तर मुख्यमंत्र्यांविरोधात कुठल्याही प्रकारची अपमानकारक आणि असंसदीय भाषेचा वापर करता येणार नाही, हे दाखवून देण्यासाठी करण्यात आल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.
नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी याआधीही ठाकरे कुटुंबाबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता जर कारवाई झाली नसती तर मुख्यमंत्र्यांना काहीही म्हणता येऊ शकते, असा संदेश गेला असता, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती. त्यानंतर राणेंना अटक करून महाड येथील कोर्टात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, नारायण राणेंवर कारवाई करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकमक होते. कायद्यापेक्षा कुणीही मोठे नाही, हा संदेस आम्हाला द्यायचा होता. आता राणेंना जामीन मिळाल्याने काही हरकत नाही, असे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.