शुगर वाढली की राणे काय बोलतात, ते त्यांनाच कळत नाही-अब्दुल सत्तार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 06:23 AM2020-10-29T06:23:04+5:302020-10-29T06:23:43+5:30
Abdul Sattar News : हिंदुत्ववादी संघटनांमार्फत कांगावा करून, भाजप शिवसेनेला बदनाम करण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने करीत असल्याची टीकाही सत्तार यांनी केली.
उरण : बीपी, शुगर वाढली की, काय आणि कसं बोलतात हे नारायण राणेंनाच कळत नाही, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि शिवसेनेवर राणे यांनी नुकत्याच केलेल्या टिकेला राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी चोख उत्तर दिले. उरण येथील पाहणी दौऱ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
करंजा मच्छीमार बंदराच्या कामाची पाहणी करण्यासाठी बुधवारी सत्तार उरण येथे आले होते. त्यावेळी मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान न करता, भाजपने गद्दारीच केली, याची जाहीरपणे कबुली रावसाहेब दानवे यांनीच दिली असल्याचे सांगत, सत्तार यांनी दानवेंच्या भाषणाची व्हिडीओ क्लिपच पत्रकारांना दाखवली. हिंदुत्ववादी संघटनांमार्फत कांगावा करून, भाजप शिवसेनेला बदनाम करण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने करीत असल्याची टीकाही सत्तार यांनी केली. पंकजा मुंडे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या वारस आहेत. त्या सेनेत आल्यास त्यांचे स्वागतच होईल. शिवसेनेशी केलेल्या गद्दारीचे भोग आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला भोगावे लागतील, असेही सत्तार यांनी सांगितले.
केंद्र सरकारने राज्याला देणं असलेली ३८ हजार कोटींची रक्कम अद्यापही दिलेली नाही. त्यातच कोविडची समस्या निर्माण झाली असली, तरी विकासाचे एकही काम राज्य सरकारने थांबविलेले नाही. नैसर्गिक आपत्तीतही शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या तरतुदीपेक्षाही अधिक रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून देण्यात आली आहे. जसजशी आर्थिक स्थिती सुधारेल, तशी त्यामध्ये वाढ केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.