"अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात अनिल परबांचं नाव घेतंलय’’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 01:43 PM2021-04-16T13:43:14+5:302021-04-16T13:46:15+5:30
Narayan Rane News : १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना द्यावा लागलेला राजीनामा यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या झालेल्या सीबीआय चौकशीबाबत नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
मुंबई - उद्योगपती अनिल अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पियोमध्ये ठेवलेली स्फोटके, मनसुख हिरेन यांची हत्या, या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze Case )यांचे आलेले नाव. त्यानंतर १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपामुळे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना द्यावा लागलेला राजीनामा यामुळे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या झालेल्या सीबीआय चौकशीबाबत नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Narayan Rane Says, "Anil Parab's name is mentioned in Anil Deshmukh's reply to CBI" )
नारायण राणे म्हणाले की, कायदेशीरदृष्ट्या पाहिलं तर अनिल देशमुख यांनी सीबीआयला दिलेल्या जबानीमध्ये जी नावं घेतली आहेत त्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी अनिल परब यांचं नाव घेतलं आहे. या प्रकरणात पुढचा नंबर अनिल परब यांचा असेल, असं आम्ही उगाच म्हटलं नव्हतं. अनिल परब हे सेवाभावी मंत्री आहेत. अजिबात कमिशन न घेता जमा करायचं आणि आणून द्यायचं. हे त्यांचं काम आहे. त्यांची चौकशी सेवा आणि मेवा कसा गोळा केला आणि कुठे पोहोचवला, यासाठी ही चौकशी चालली आहे.
दरम्यान, सीबीआय चौकशीचा अहवाल १५ दिवसांच्या आत जाहीर होईल. तसेच त्यामध्ये अनिल देशमुखांचं खरं रूप आणि ते कुणाच्या सांगण्यावरून हे करत होते त्यांचा भांडाफोड होईल. तसेच अनिल परब हे चौकशीसाठी तयार नसतील तर त्यांना उचलून चौकशीला नेलं जाईल, चौकशीला जाण्यापूर्वी त्यांना राजीनामा द्यावा लागेल, असेही नारायण राणे म्हणाले.
सचिन वाझे प्रकरणावरूनही माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. सापडलेला सचिन वाझे हा एक आहे. मात्र नजरेसमोर आलेले सचिन वाझे अनेक आहेत. सरकारला नको असलेल्या लोकांना मारण्याचे काम सुरू आहे. आता एनआयएच्या तपासामधून अनेक बाबी उघड होतील, असा दावाही नारायण राणे यांनी केला.