नारायण राणेंचा शरद पवारांना टोला; पार्थ परिपक्वच, तो १८ वर्षाचा असून निवडणूक लढवली आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 04:50 PM2020-08-16T16:50:25+5:302020-08-16T16:55:15+5:30
संजय राऊत वारंवार सुशांत प्रकरणाचा आदित्यशी संबंध नाही असं सांगत असल्याने संशय अधिक वाढला असल्याचा टोला नारायण राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे.
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जाहिररित्या पार्थ पवार यांना फटकारल्यानंतर आता या प्रकरणावरुन भाजपा-राष्ट्रवादी यांच्यात राजकारण रंगलं आहे. पार्थ पवार हा १८ वर्षाचा असून त्याने लोकसभा निवडणूक लढवली आहे त्यामुळे तो परिपक्वच आहे असा टोला माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी शरद पवारांना लगावला आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले की, पार्थ हा राजकारणात आहे, त्याचे १८ वर्षाचा झाला आहे. शिवाय त्याने मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली आहे. सुशांत प्रकरणात पार्थ यांनी सीबीआयची केली मागणी ही त्यांच्या स्वत:चे काही विचार असतील त्यामुळे केली असेल असं नारायण राणेंनी सांगितले. तसेच सुशांत प्रकरणात मी कधीही आदित्य ठाकरेंचे नाव घेतले नाही. मीडियानेच त्यांचे नाव घेतले आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे, न्यायालय निर्णय घेईल. मात्र संजय राऊत वारंवार या प्रकरणाचा आदित्यशी संबंध नाही असं सांगत असल्याने संशय अधिक वाढला असल्याचा टोला नारायण राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे.
पार्थ पवारांची भूमिका राष्ट्रवादीशी विसंगत
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पार्थ पवार प्रकरण गाजत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणावेळी पार्थ पवारांनी जाहीरपणे समर्थन करत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पार्थ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावं अशी मागणी केली होती. मात्र या दोन्ही मागण्या राष्ट्रवादीच्या भूमिकेशी विसंगत असल्याने पार्थ पवार यांना शरद पवारांनी जाहिरपणे फटकारलं होतं.
शरद पवार काय म्हणाले होते?
पार्थ पवार यांच्या मागणीवर शरद पवार यांनी कठोर भूमिका घेतली होती. याविषयी शरद पवार म्हणाले की, "नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत आम्ही देत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. परंतु सीबीआय चौकशी जर कोणाला करायची असेल, मी स्पष्ट सांगितलं की माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल की सीबीआय चौकशीची मागणी करावी, तर त्यालाही कोणी विरोध करायचं कारण नाही.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...पुन्हा आबांनी मुलांचा अभ्यास घेण्याचा प्रयत्न केला नाही; रोहित पाटलांकडून आठवणींना उजाळा
मला माझं काम करु द्या, पार्थ प्रकरणावर बोलण्यास अजितदादांचा नकार
अलविदा रॉकी! गुन्हेगारांचा कर्दनकाळ काळाच्या पडद्याआड; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
राजसाहेब, मला माफ करा! मनसेच्या शहराध्यक्षांनी सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या
कोरोना व्हायरसच्या लक्षणांचा क्रम संशोधकांनी शोधला; डॉक्टरांना मिळणार मोठी मदत