Narayan Rane: "उद्धव ठाकरे आमचे दैवत; देवावर हात उचलण्याची भाषा केली तर युवासैनिक सहन करणार नाही!' वरुण सरदेसाईंचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 12:38 PM2021-08-24T12:38:53+5:302021-08-24T12:39:08+5:30
Narayan Rane News: वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या सैनिकांनी नारायण राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी धडक दिली असून, येथेही युवासेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.
मुंबई - केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या विधानामुळे पेटलेला वाद आता विकोपाला गेला आहे. या वक्तव्याविरोधात राज्यातील विविध भागात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तसेच शिवसैनिक आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने येत आहेत. दरम्यान, वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या सैनिकांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जुहू येथील निवासस्थानी धडक दिली असून, येथेही युवासेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. दरम्यान, वरुण सरदेसाई यांनी आक्रमत प्रतिक्रिया देत राणे कुटुंबीयांना थेट इशारा दिला आहे. ('' Uddhav Thackeray is our God; The young soldier will not tolerate if he speaks of raising his hand against God! ' Direct warning from Varun Sardesai)
जुहू येथे युवासैनिकांसह आलेले वरुण सरदेसाई म्हणाले, की शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे दैवत आहेत. आमच्या देवावर हात उगारण्याची भाषा कुणी करत असेल तर ते युवासैनिक सहन करणार नाही. उद्धव ठाकरेंसाठी आम्ही शेकडो लाठ्या खाण्यास तयार आहोत.
यावेळी वरुण सरदेसाई यांनी नितेश राणेंनी दिलेल्या आव्हानाचाही समावेश दिला. येथे आम्ही आलो नाही. तर आम्हाला आव्हान दिले गेले होते. सिंहाच्या गुहेत येऊन दाखवा, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले होते. मात्र आम्ही सिंहाच्या गुहेसमोर नाही तर उंदराच्या बिळासमोर आलो आहोत, असा टोला वरुण सरदेसाई यांनी लगावला आहे.
दरम्यान, नारायण राणे यांच्या विधानानंतर शिवसेना आक्रमक झाल्याने महाराष्ट्रातील विविध भागात शिवसेना आणि भाजपाचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. तसेच मुंबईसह अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने येत आहेत. एकीकडे नाशिक पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी रवाना झाले आहेत. मात्र नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा चिपळूणमध्ये सुरू आहे.