परिवहन मंत्री अनिल परब ‘त्या’ व्हिडीओनं अडचणीत येणार; लवकरच CBI चौकशी सुरु होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 04:25 PM2021-08-25T16:25:55+5:302021-08-25T16:27:05+5:30
या क्लीपमधून काही संशय निर्माण होतो. कोर्टात सुनावणी झाली नसतानाच अनिल परब यांच्याकडे आधी माहिती कशी आली? असा सवाल शेलारांनी विचारला आहे.
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप भाजपा केला होता. त्यातच परिवहन मंत्री अनिल परब यांची क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं ही शंका आणखी बळावली. त्यामुळे आता मंत्री अनिल परब यांच्या व्हिडीओवरुन राणेंच्या अटक प्रकरणाची सीबीआय(CBI) चौकशी व्हावी अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार(BJP Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
आशिष शेलार पत्रकार परिषदेत म्हणाले की, गृहखात्यावरुन शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात मतभेद असल्याचं ऐकीवात होतं. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणाऱ्या गृहखात्यात शिवसेनेच्या मंत्र्यांची लुडबुड असल्यानं शरद पवार नाराजही होते. परंतु काल सोशल मीडियावर जी क्लीप व्हायरल झाली. त्यामुळे हे समोर आलं आहे. मंत्री अनिल परब फोनवर बोलताना ज्यारितीने दबाव टाकत होते. ते पाहता या नारायण राणे यांच्या अटक प्रकरणाभोवती संशयाचं वातावरण निर्माण होत आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायली त्यातून सत्य बाहेर येऊ शकतं असं त्यांनी सांगितले.
पोलीस बळ वापरा अन् अटक करा, कसलं वॉरंट मागतायेत?; मंत्री अनिल परबांची क्लीप व्हायरल
तसेच या क्लीपमधून काही संशय निर्माण होतो. कोर्टात सुनावणी झाली नसतानाच अनिल परब यांच्याकडे आधी माहिती कशी आली? अनिल परब हे खोटे बोलत आहेत का? मुंबई हायकोर्टाचा उल्लेख केला होता. न्यायालयीन प्रक्रियेत फेरफार केलाय का? यावर शंका उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणावर संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी असं शेलारांनी म्हटलं आहे.
"शिवसेनेचा राग नव्हे तर थयथयाट; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाची माफी मागावी"
कोकणी माणसाला सन्मान मिळाल्यास शिवसेनेच्या पोटात दुखतं
नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची भीती सरकारमध्ये का आहे? कोकणातील कुठल्याही माणसाला सन्मानाचं स्थान दिल्लीत मिळालं तरी शिवसेनेच्या पोटात दुखतं. सुरेश प्रभूंचाही अपमान केला गेला. राणेंना केंद्रीय मंत्री केल्यापासून उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या पोटात दुखायला लागलं हे सत्य आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा केंद्रीय मंत्र्याला अटक केली. ठाकरे सरकारनं काल जे काही केले तो तालिबानी कारभार होता. राज्यातलं सरकार अवैधपणे दबावतंत्राचा वापर करतंय असा आरोपही शेलारांनी केला. पोलीस बाजूला ठेऊन आंदोलनाला या मग आपण दोन होत करू असा इशाराही शेलार यांनी शिवसेनेला दिला आहे.
पोलीस बळ वापरा अन् अटक करा, कसलं वॉरंट मागतायेत?
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांची क्लीप व्हायरल होत आहे. यात अनिल परब पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधत असल्याचं दिसतात. त्यात कसलं अटक वॉरंट मागतायेत? पोलीस बळाचा वापर करून अटक करा असं ते सांगत असल्याचं स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे. तर रत्नागिरी एसपी नारायण राणेंकडे गेले असता त्यांच्याकडे अटक वॉरंटची मागणी होत होती. जोपर्यंत अटक वॉरंट दाखवत नाहीत तोवर अटकेला विरोध करू असा पवित्रा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी घेतला होता.