Narayan Rane vs Shivsena: पोलीस बळ वापरा अन् अटक करा, कसलं वॉरंट मागतायेत?; मंत्री अनिल परबांची क्लीप व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 07:12 PM2021-08-24T19:12:12+5:302021-08-24T19:15:52+5:30
यातच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांची क्लीप व्हायरल होत आहे.
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राणेंना अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. नाशिकमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी राणेंच्या अटकेसाठी प्रक्रिया सुरु केली परंतु नारायण राणेंना अटक करण्याची कुठलीही अटक वॉरंट पोलिसांकडे नसल्याचा दावा भाजपाने केला आहे.
यातच महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांची क्लीप व्हायरल होत आहे. यात अनिल परब पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरुन संवाद साधत असल्याचं दिसतात. त्यात कसलं अटक वॉरंट मागतायेत? पोलीस बळाचा वापर करून अटक करा असं ते सांगत असल्याचं स्पष्टपणे ऐकायला मिळत आहे. तर रत्नागिरी एसपी नारायण राणेंकडे गेले असता त्यांच्याकडे अटक वॉरंटची मागणी होत आहे. जोपर्यंत अटक वॉरंट दाखवत नाहीत तोवर अटकेला विरोध करू असा पवित्रा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी घेतला आहे.
“...मग पुन्हा कुणी असं धाडस करू नये”; चंद्रकांतदादांचे BJP कार्यकर्त्यांना आदेश
याबाबत प्रमोद जठार म्हणाले की, आम्ही हायकोर्टाकडे जामीनासाठी अर्ज केला आहे. परंतु पोलीस कुठेही अटक वॉरंट दाखवायला तयार नाहीत. आमच्यावर खूप दबाव असल्याचं पोलीस सांगत आहेत. कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे केंद्रीय मंत्री असल्याने योग्य तो शिष्टाचार पाळून अटक करावी असं सांगितले आहे. पण पोलीस म्हणतात आम्हाला वरून दबाव आहे. ५ मिनिटांत अटक करायला सांगितले आहे. पण तुम्ही ऑर्डर तरी दाखवा आम्ही स्वत: गाडीत येऊन बसू असं त्यांनी सांगितले आहे.
नारायण राणेंची अटक बेकायदेशीर, वकीलांचा दावा
नारायण राणे यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यात जे कलम लावण्यात आले आहेत. त्यात ७ वर्षापेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ७ वर्षापेक्षा कमी शिक्षा असेल तर थेट अटक करण्याचा पोलिसांना अधिकार नाही. त्यामुळे नारायण राणे यांना केलेली अटक बेकायदेशीर आहे. त्यामुळे या अटकेविरोधात आम्ही योग्य त्या वेळी योग्य ठिकाणी दादा मागू अशी माहिती नारायण राणेंचे वकील अनिकेत निकम यांनी पुढे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांच्या माध्यमातून वारंवार सांगितलेले आहे की, एखाद्या गुन्ह्यात ७ वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद असेल तर भादंवि कलम ४१ (अ) अन्वये नोटीस बजावून नंतर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे. मात्र, थेट अटक करण्याचा अधिकार नाही.त्यामुळे नारायण राणेंची अटक बेकायदेशीर असल्याचं वकील अनिकेत निकम यांनी म्हटलं आहे.
थेट राणे कुटुंबाला भिडणारा शिवसेनेचा नवा वाघ; कोण आहे आक्रमक चेहरा?
“राणेंच्या जीवाला धोका, रस्त्यात साहेबांचा खून करणार आहे”
नारायण राणे जेवण असताना त्यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. इतकचं नाही तर साहेबांचा वाटेत खून करणार आहात असा गंभीर आरोप भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केला. राणे पुत्र नितेश-निलेश हे दोघंही अटक वॉरंट आणि नोंदी दाखवण्याची मागणी करत आहेत. जोपर्यंत नोंद दाखवत नाही आम्ही उठणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. तर राणेंच्या जीवाला धोका आहे. तुम्ही रस्त्यात मारणार आहात, खून करणार आहात असा गंभीर आरोप प्रसाद लाड यांनी केला आहे.