Narayan Rane vs Shivsena: नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक, वाद चिघळला!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 10:11 AM2021-08-24T10:11:37+5:302021-08-24T10:13:16+5:30
Narayan Rane vs Shivsena: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे.
Narayan Rane vs Shivsena: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. नारायण राणे यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल होत असताना नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपाच्या मुख्य संपर्क कार्यालयावर दगडफेक करुन तोडफोड केली आहे.
नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलिसांकडून अटकेचे आदेश, पथक रवाना
भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झालेला असताना नाशिकच्या भाजपा कार्यालयाबाहेर कोणताही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला नव्हता. युवासेनेचे चार कार्यकर्ते एका कारमधून कार्यालयाबाहेर आले आणि त्यांनी भाजपा कार्यालयावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यात भाजपा कार्यालयाच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. यानंतर दगडफेक करणाऱ्यांनी नारायण राणेंविरोधात घोषणाबाजी करत माफी मागा नाहीतर परिणाम आणखी वाईट होतील असा इशारा देखील त्यांनी दिला.
“खऱ्या आईचे दूध प्यायला असाल तर…” निलेश राणेंचे शिवसेनेला थेट आव्हान
राज्यात ठिकठिकाणी शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले असून राणेंविरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत. मुंबईतील जुहू येथे राणेंच्या निवासस्थानाबाहेर देखील तणावाचं वातावरण आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते जमा झाले असून राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी देत आहेत.
काय होतं राणेंचं वादग्रस्त विधान?
नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेवेळी काल महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी जोरदार प्रहार केला. मात्र, टीका करण्याच्या नादात राणे यांनी वादग्रस्त विधान केले. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती, असे नारायण राणे म्हणाले. या पत्रकार परिषदेला भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं चिथावणीखोर विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंना महागात पडण्याची शक्यता आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले आहेत. त्यानंतर नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे.