नरेंद्र मेहतांची भाजपात मोर्चेबांधणी: व्यास यांच्या नियुक्तीचा 2 दिवसांत विचार करावा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 06:59 PM2021-06-27T18:59:21+5:302021-06-27T19:22:55+5:30

Mira Road News : गेल्यावर्षी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन राजकारणापासून दूर होत असल्याचे स्वतः व्हिडिओद्वारे जाहीर केले होते.

Narendra Mehta's BJP Politics in mira road | नरेंद्र मेहतांची भाजपात मोर्चेबांधणी: व्यास यांच्या नियुक्तीचा 2 दिवसांत विचार करावा अन्यथा...

नरेंद्र मेहतांची भाजपात मोर्चेबांधणी: व्यास यांच्या नियुक्तीचा 2 दिवसांत विचार करावा अन्यथा...

Next

मीरा रोड - मीरा भाईंदर भाजपाच्या जिल्हाध्यक्षपदी रवी व्यास यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नियुक्ती केल्याच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र मेहता व त्यांचे समर्थक यांनी भाजपात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर मेहता समर्थकांनी २ दिवसांच्या मुदतीचा दिलेला इशारा प्रदेश नेतृत्वाने केराच्या टोपलीत टाकला आहे. 

गेल्यावर्षी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन राजकारणापासून दूर होत असल्याचे स्वतः व्हिडिओद्वारे जाहीर केले होते. मेहतांविरोधात बलात्काराची तक्रार तसेच त्यांची अर्धनग्न अवस्थेतील व्हिडीओ क्लिप वायरल झाल्याच्या अनुषंगाने मेहता यांनी अशा प्रकारची भूमिका घेतल्याचे मानले जात होते. परंतु प्रत्यक्षात मात्र मेहता हे महापालिकेत तसेच भाजपच्या राजकीय घडामोडीत सुद्धा सक्रिय राहिले. 

भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी हेमंत म्हात्रे यांची पुन्हा नियुक्ती झाल्यानंतर सुद्धा मेहता व समर्थकांनी विरोधात भूमिका घेतली. आता नगरसेवक रवि व्यास यांच्या हाती जिल्हाध्यक्ष पदाची धुरा स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली असतानासुद्धा थेट पक्षनेतृत्वाला आव्हान दिले. व्यास यांची नियुक्ती कोणालाच विश्वासात न घेता केल्याचा आरोप करत मेहता व समर्थकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पक्ष नेतृत्वास निवेदन देऊन व्यास यांच्या नियुक्तीचा दोन दिवसात विचार करावा अन्यथा पुढची दिशा ठरवू अशी गर्भित धमकीच मेहता समर्थकांनी पक्ष नेतृत्वास दिली. 

२४ तारखेपर्यंतचे अल्टीमेटम देऊन सुद्धा प्रदेश नेतृत्वाने मेहता समर्थकांच्या दबावाला भीक न घालण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच पक्ष नेतृत्वाने व्यास यांचे जिल्हाध्यक्ष पद आजही कायम ठेवल्याने मेहता समर्थकांचे इशारे पोकळ ठरले आहेत. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांच्या महापालिका दालनात सुद्धा मेहता व व्यास यांची भेट झाली. परंतु तोडगा निघाला नाही. तर  मेहता यांनी नुकतीच भाजप नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत मेहता यांनी भाजपात अधिकृतपणे सक्रिय होण्याचे संकेत दिले. 

रविवारी भाजपाच्या सृष्टी मंडळाची बैठक बोलावण्यात आली. भाजपाची प्रत्येक मंडळ निहाय बैठक घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्या माध्यमातून मेहतांनी भाजपा संघटना स्वतःच्या बाजूने करण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. विशेष म्हणजे पक्षाची बैठक असताना  नवनियुक्त भाजप जिल्हाध्यक्ष व्यास यांना डावलले जात आहे. एकूणच मीरा भाईंदर मध्ये मेहता जे सांगतील व ठरवतील तोच भाजपा असे चित्र निर्माण केले जात असल्यावे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. 
 

Web Title: Narendra Mehta's BJP Politics in mira road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.