नरेंद्र मोदी की उद्धव ठाकरे? महाराष्ट्र कुणाच्या कामगिरीवर अधिक समाधानी, जनतेने दिला असा कौल
By बाळकृष्ण परब | Published: January 15, 2021 10:28 PM2021-01-15T22:28:58+5:302021-01-15T22:43:40+5:30
Maharashtr News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारगिरीच्या जनतेने केलेल्या मूल्यमापनामधून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
मुंबई - केंद्र सरकार आणि विविध राज्यांमधील सरकारांच्या कोरोनाकाळातील तसेच एकंदरीत कामगिरीबाबत जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेमधून जनतेचा कल समोर आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारगिरीच्या जनतेने केलेल्या मूल्यमापनामधून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.
एबीपी न्यूज आणि सीव्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यामध्ये सरासरी ५८ टक्के लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर समाधानी दिसून आले. तर राज्यातील सरासरी ४७ टक्के लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर समाधानी दिसून आले. दरम्यान, देशव्यापी विचार केल्यास देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीवर ६६ टक्के जनतेने समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर किती समाधानी आहात अशा विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ४६ टक्के लोकांनी खूप समाधानी, ३२ टक्के लोकांनी समाधानी, २० टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे सरासरी ५८ टक्के लोक सरकारच्या कामगिरीवर समाधानी दिसून आले.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीचा विचार केल्यास ४८ टक्के लोक खूप समाधानी, २५ टक्के लोक समाधानी, तर २६ टक्के लोक असमाधानी असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यातील सरासरी ४७ टक्के लोक पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे दिसून आले.
दरम्यान,देशात सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी आहेत. या यादीत ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या कारभारावर ७९ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या (७८ टक्के), आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी तिसऱ्या (६७ टक्के) स्थानी आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर ५८ टक्के लोक संतुष्ट आहेत. विशेष म्हणजे पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही.