राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्येच भाजपा नेता गेल्यानं रंगली 'टाळी'ची चर्चा; पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2021 12:51 PM2021-03-06T12:51:57+5:302021-03-06T13:55:49+5:30
in nashik BJP leader meets mns chief raj thackeray: नाशिकच्या राजकीय वर्तुळात भेटीची चर्चा; मनसे-भाजपची वाढती जवळीक
नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यानं हॉटेलमध्ये जाऊन राज ठाकरेंची भेट घेतल्याची चर्चा रंगली. पण आपण राज ठाकरेंची भेट घेतली नसल्याचं भाजप नेत्यानं स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्यामागचे रहस्य!
राज ठाकरे शुक्रवारपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आज सकाळी भाजप नेते गिरीश पालवे मनसेप्रमुख राज ठाकरेंचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले. त्यामुळे पालवे आणि राज ठाकरेंच्या भेटीची चर्चा रंगली. पालवे यांनी राज ठाकरेंची भेट घेतलीअसून मनसे-भाजपा एकत्र येऊ शकतात, अशी कुजबूज सुरू झाली. या संदर्भात लोकमतने गिरीश पालवे यांच्याशी संपर्क साधला असता, आपण जयकुमार रावल यांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो होतो, राज ठाकरेंची भेट झालेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
“हॉस्पिटलमध्ये गेल्यावर जे भोगावे लागते ना...”; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला तर मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये मनसेनं भाजपला मदत केली होती. त्यामुळे स्थायी समिती सभापती निवडणुकीतदेखील मनसे भाजपाला मदत करणार आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशकात भाजप आणि मनसेची जवळीक वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत मनसे-भाजपची युती होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस लग्न सोहळ्यात एकत्र
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले होते. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सध्या नाशिकमध्येच मुक्कामी आहे. त्यामुळे भाजप-मनसेची युती होणार का, याबद्दलच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
नाशिक महापालिका, सत्ताकारण अन् मनसे-भाजपचं राजकारण
नाशिक महापालिकेत गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत भारतीय जनता पार्टीच्याच पाठिंब्याने मनसेला सत्ता स्थापन करता आली होती. त्यानंतर गेल्या निवडणुकीच्या वेळी मनसेतील अर्ध्यापेक्षा अधिक नगरसेवक भारतीय जनता पक्षात गेले होते व भाजपची सत्ता आकारास आली आहे. भाजपच्या या सत्तेला चालू कारकीर्दीत कसलाही प्रभाव निर्माण करता आलेला नाही. त्यामुळे मनसेतून भाजपमध्ये आलेल्या अनेक नगरसेवकांना पश्चात्ताप झाला आहे.
दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना यांचा प्रभाव वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत भाजपाला स्वबळावर पुन्हा महापालिकेत सत्ता स्थापन करणे अवघड दिसत असल्याने तेदेखील मनसेला टाळी द्यायला उत्सुक असल्याची चर्चा आहे
महापालिकेत सद्यस्थिती काय?
सद्यस्थितीत नाशिक महापालिकेत मनसेचे फक्त पाच नगरसेवक आहेत, त्यामुळे त्यांनाही स्वबळाची भाषा करणे शक्य नाही. परिणामी उभयपक्षी सोयीचा मामला म्हणून मनसे भाजपा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे