...तर नारायण राणेंना पुन्हा अटक होणार; अडचणी संपता संपेनात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 08:23 AM2021-08-25T08:23:38+5:302021-08-25T09:11:26+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी अडचणी कायम
नाशिक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणेंना काल अटक झाली. रात्री त्यांना जामीनदेखील मिळाला. नारायण राणेंच्या अटकेची शक्यता निर्माण झाल्यापासूनच राज्यातलं राजकारण तापलं. राणेंना जामीन मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मात्र राणेंच्या अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. महाडमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी त्यांना जामीन मिळाला आहे. आता त्यांना पुढील महिन्यात नाशिक पोलिसांसमोर हजर राहावं लागणार आहे. नाशिकमध्येच राणेंविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला होता. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी राणेंच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.
नाशिक पोलीस ठाण्यात नारायण राणेंना २ सप्टेंबरला हजर राहावं लागणार आहे. तशी नोटीस तपास अधिकारी आनंद वाघ यांनी बजावली आहे. या नोटिशीत कलम ५००, ५०५ सह इतर कलमांचा उल्लेख आहे. अशाच प्रकारची कलमं राणेंविरोधात महाड पोलीस ठाण्यातही दाखल करण्यात आली होती. त्यामुळे नारायण राणेंना नाशिक सायबर पोलीस स्थानकात हजर राहावं लागेल. अन्यथा त्यांच्या अडचणी वाढू शकतात. त्यांना अटकदेखील होऊ शकते. नाशिकप्रमाणेच गुन्हे दाखल झालेल्या अन्य पोलीस ठाण्यांतही राणेंना हजर राहावं लागू शकतं.
Nashik Police send notice to Union Minister Narayan Rane in connection with an FIR against him and asked him to appear at the police station on 2nd September: Nashik Police#Maharashtra
— ANI (@ANI) August 25, 2021
नारायण राणेंची उच्च न्यायालयात याचिका
नारायण राणेंविरोधात महाड, नाशिकसह पुणे, ठाणे, मुंबईतही गुन्हे दाखल झाले आहेत. या ठिकाणीदेखील राणेंना हजेरी लावण्याची गरज भासू शकते. या प्रकरणी राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माझ्याविरोधात चुकीच्या पद्धतीनं गुन्हे दाखल करण्यात आले असून अटकदेखील बेकायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला आहे. माझ्याविरोधातील गुन्हे रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. या प्रकरणी न्यायालय काय निकाल देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.